* प्रकल्प समितीचे प्रमुख प्रवीण दटके यांचे प्रतिपादन * २०१८ पर्यंत कामे होणार पूर्ण * लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

सिमेंट रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत व त्यामुळे लोकांना त्रास होत आहे हे मान्य आहे, पण उत्तम दर्जाच्या कामांसाठी लोकांना त्रास सहन करावाच लागेल. ही सर्व कामे २०१८ पर्यंत पूर्ण व्हावी, असे प्रयत्न महापालिकेचे आहेत, असे महापालिकेच्या प्रकल्प समितीचे प्रमुख व माजी महापौर प्रवीण दटके यांनी सांगितले.

माजी महापौर प्रवीण दटके यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. शहरात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सरकार आणि महापालिका यांच्यामध्ये समन्वय साधून ही कामे लवकर मार्गी कशी लावता येईल, या दृष्टीने नियोजन केले जात आहे. या कामांमुळे जनतेला त्रास होतो आहे हे मान्य आहे. मात्र, उत्तम दर्जाच्या कामांसाठी काही दिवस हा त्रास नागपूरकरांना सहन करावाच लागेल, असे दटके म्हणाले. सिमेंट रस्त्यांच्या दर्जाबाबत जनमंचने केलेल्या तक्रारीच्या आधारावर खासगी संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. आयुक्त चौकशी करीत असून दोषींवर कारवाई केली जाईल.

बीओटी तत्त्वावर महाल, सक्करदरा बाजार आणि सोख्ता भवन येथे उभारण्यात येणाऱ्या कॉम्प्लेक्सची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. नागनदीचा विषय मार्गी लावला जात आहे. वाठोडामधील ‘साई’चा विषयासंदर्भात काँग्रेसने आरोप केला आहे. ते करणे सोपे मात्र, प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे त्यांनी पाहावे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर लोकांनी घरे बांधली. त्यामुळे हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे. सिम्बॉयसीचे काम सुरू झाले असून ऑरेंज स्ट्रिटचा आराखडाही तयार झाला आहे. २०१८ मध्ये त्याचे काम सुरू होईल. बीओटीचे प्रकल्प आता महापालिका करणार आहे. सगळी कामे नियमानुसार होईल. नागपूर सुधार प्रन्यासकडे जे प्रकल्प, भूखंड आहे ते महापालिकेकडे स्थानांतरित होईल. याबाबत मुंबईला दोन बैठकी झाल्या आहेत. कॉटन मार्केट उपबाजाराचे आरक्षण रद्द केले जणार आहे. त्या ठिकाणी मोठे कॉम्प्लेक्स होईल. तेथील गाळेधारकांना जागा देण्यात येणार आहे. शिवाय जाहीर सभा किंवा कार्यक्रमासाठी सभागृह बांधले जाणार आहे.

सक्षम अधिकाऱ्यांची गरज

शहरातील विविध प्रकल्पांच्या कामासाठी तांत्रिकदृष्टय़ा सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. चांगल्या माणसाशिवाय काम होऊ शकत नाही. नव्या आकृतीबंधात किती अभियंते घेतले जातात ते बघायचे आहे. महापालिकेतील चांगले अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत आणि काही निवृत्तीच्या मार्गावर आहेत.