माहितीच्या अधिकारात वास्तव उघड;महापालिका म्हणते, ३५ हजार ७१७ खड्डे बुजवले

नागपूर : तीन वर्षांत ३५ हजार ७१७ खड्डे बुजवले आणि त्यावर १६ कोटी रुपये खर्च करण्यात आले, अशी माहिती महापालिकेने  माहितीच्या अधिकारात दिली आहे. आता नुसते खड्डय़ांवर असे १६ कोटी रुपये उधळले जात असतील तर एकूणच रस्ते दुरुस्तीचा आकडा किती कोटींच्या घरात असेल, याच्या नुसत्या कल्पनेने सर्वसामान्य नागपूरकरांच्या अंगावर काटा येईल.

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे, परंतु शहरभरातील रस्त्यांवरच्या खड्डय़ांमुळे नागरिकांना अपार त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे रस्त्यात आहेत की रस्ताच खड्डय़ात आहे, हे न कळण्याइतपत रस्त्यांची चाळण झाली आहे. विशेष म्हणजे, पावलापावलावर असे खड्डे दिसत असताना महापालिकेकडे मात्र याची माहिती नाही.

माहितीच्या अधिकारात रस्त्याच्या खड्डय़ांबाबत अधिकाऱ्यांनी दिलेली त्रोटक माहिती बघता महापालिका प्रशासन रस्त्यावरील खड्डय़ांबाबत किती गंभीर आहे, हे ठळकपणे अधोरेखित झाले आहे. गुळगुळीत रस्त्यांबाबत नागपूरचे नाव घेतले जात होते आणि त्याचे अनुकरण अन्य शहरात केले जात होते, मात्र शहरातील विविध भागात सिमेंटच्या रस्त्यांची कामे सुरू असताना डांबरी रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

खड्डय़ांमुळे मृत्यू ही महापालिकेची जबाबदारी नाही

अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीनुसार, महापालिकेने १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या काळात १६ कोटी रुपयांचा खर्च खड्डय़ांवर केला आहे. सिमेंट रस्ते आणि मेट्रोच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची नासधूस झाली आहे. शहरात ठिकठिकाणी खड्डे  आहेत. अपघाताचे प्रमाण वाढले आहे.  खड्डय़ांमुळे झालेले अपघात आणि त्या अपघातातून झालेले मृत्यू आणि दिलेली भरपाई याबाबतचा प्रश्न हा विभागाशी संबंधित नसल्याचे सांगत त्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात देणे टाळले आहे.  खड्डय़ाच्या प्राप्त तक्रारीवर पावसाळा वगळता अति तातडीने दखल घेत खड्डे बुजवले जाते, असे आश्चर्यकारक उत्तरही देण्यात आले आहे, परंतु जेव्हा महापालिकेला शहरात एकूण खड्डे किती, हेच माहिती नसताना अति तातडीने काम कसे झाले असेल हा मोठाच प्रश्न आहे.