अनधिकृत धार्मिक स्थळांचा वाद

नागपूर : अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला शुक्रवारी सतनामी नगर, बेलतरोडी, रामेश्वरी भागात गेलेल्या पथकाला पुन्हा एकदा जनसंतापाला तोंड द्यावे लागले. नागरिकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना घेराव घातला. त्यामुळे कारवाई न करताच पथक माघारी फिरले.

शुक्रवारी महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या पथकाला १० पैकी केवळ एकच कारवाई करता आली.  लकडगंज झोनअंतर्गत गरोबा आणि सतनामी नगरातील एकूण ६ धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येणार होती. मात्र, सर्वच ठिकाणी परिसरातील नागरिक आणि भाजप नगरसेवक, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पथकाला अक्षरशा पिटाळून लावले. सतनामी नगरातील  हिरा पॅलेसजवळ लोकांनी रस्त्यावर ठाण मांडले. पोलीस बंदोबस्त असताना पथक कारवाई न करताच परतले.

बेलतरोडीतील  खुल्या भूखंडावरील धार्मिक स्थळे तोडण्यासाठी पथक पोहोचले असता लोकमोर्चाचे मुन्ना महाजन यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कारवाईला विरोध केला. एकाही कर्मचाऱ्याला आणि पोलिसांना मंदिर परिसरात प्रवेश करू दिला नाही. त्रिशरण चौकातील धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली.

न्यायालयाच्या आदेशाला आव्हान

न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू केलेल्या महापालिकेच्या कारवाईवर आक्षेप घेणाऱ्यांनी प्रथम ५० हजार रुपये भरावे त्यानंतरच त्यांच्या आक्षेपावर सुनावणी  होईल, असे न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले होते. त्याला आज कारवाई दरम्यान नागरिकांनी आव्हान दिले.

आम्ही पैसेही भरणार नाही आणि धार्मिक स्थळेही तोडू देणार नाही, असा इशारा पूर्व नागपुरातील काही भाजप नगरसेवकांनी दिला.  दोन प्रकरणात संबंधित व्यवस्थापनाने पैसे भरण्याची तयारी दाखवल्याने कारवाई थांबवण्यात आली. मात्र, पैसे भरण्यास नकार देणाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.