News Flash

मालमत्ता कर स्वयंमूल्यनिर्धारणाच्या अर्जाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम

महापालिकेतर्फे घरोघरी मालमत्ता कर स्वयंमूल्यनिर्धारणाचे अर्ज वाटले जात आहे.

महापालिकेने या आर्थिक वर्षांपासून नवी करप्रणाली अंमलात आणताना ती सोपी असल्याचे सांगून कोणत्याही नागरिकाला त्याचे मालमत्ता करनिर्धारण करता येईल, असा दावा करण्यात आला आहे. घरोघरी त्यासाठी स्वयंमूल्यनिर्धारणाचे अर्ज वितरित केले जात आहे, मात्र हे अर्ज कशाचे आहे, ते कसे भरायचे आहे याबाबत कुठलीच माहिती दिली जात नसल्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत.
महापालिकेची आर्थिक स्थिती बघता आणि उत्पन्नाचा स्रोत वाढावा यादृष्टीने महापालिकेच्या कर विभागाने नव्या कर प्रणालीनुसार चालू आर्थिक वर्ष २०१५-१६ पासून नवीन मालमत्ता कर निर्धारण प्रणाली लागू केली आहे. महापालिकेच्या सीमेतील नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे स्वयंमूल्यनिर्धारण करून मालमत्ता कर २०१६ भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. यासाठी सामान्य करात ५ टक्के सूट देण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे घरोघरी मालमत्ता कर स्वयंमूल्यनिर्धारणाचे अर्ज वाटले जात आहे. यात मालमत्ताधारकांचे नाव, पत्ता व मालमत्तेचा अन्य तपशील भरायचा आहे. हा अर्ज अत्यंत किचकट पद्धतीने तयार करण्यात आला आहे. यातील टेबल क्रमांक १ मध्ये युनिट क्रमांक, युनिटचे क्षेत्रफळ, वार्डाच्या ब्लॉकच्या भाडेदर, बांधकाम प्रकाराचा भारांक, मालमत्तेचा वापराचा भारांक, इमारतीचे वय, रहिवाशाच्या प्रकाराचा भारांक, कर आकारण्याचा दिनांक, अशी माहिती देणे आवश्यक केले आहे. तसेच भूखंडाचे क्षेत्रफळ, ब्लॉकचा भाडे दर, वापराचा भारांक व रहिवाशांचा भारांक या सर्व आकाडय़ांचा गुणाकार करून नागरिकांना मासिक भाडे काढावे लागेल. या आकडय़ाचा आधार घेत वार्षिक मूल्य किती आहे ते सुद्धा नागरिकांना ठरवायचे आहे. शिवाय युनिटनिहाय वार्षिक भाडे मूल्य वेगवेगवेळे निघणार आहे, तर अर्जाच्या मागील बाजूस सामान्य कर, आम पाणीपट्टी कर, मलजल कर, अग्निशमन कर, पाणी लाभ कर, पथ कर, महापालिका शिक्षण कर, शिक्षण कर (शासनाचा), रोजगार हमी योजना कर, विशेष सफाई कर, प्रती युनिट मालमत्ता कर, अशी सर्व आकडेमोड करावी लागणार आहे. शिवाय या सर्वाची बेरीज करून नागरिकांना आपल्या मालमत्तेचा वार्षिक कर काढावा लागणार आहे. अत्यंत किचकट ही आकडेमोड असल्यामुळे अर्ज भरून स्वत:चा मालमत्ता कर स्वत: कसा काढावा हा सामान्य नागरिकांपुढे प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान, मालमत्तेचे स्वयंमूल्यनिर्धारण करण्यासाठी एका खासगी संस्थेला काम देण्यात आले आहे. या खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मदत करणे अपेक्षित आहे. मात्र, हे कर्मचारी केवळ अर्ज वाटपाचे काम करीत असताना तो कसा भरायचा हे मात्र सांगितले जात नाही. त्यामुळे अनेकांकडे देण्यात आलेले अर्ज पडून आहेत. तुम्ही तुमचे केवळ नाव, मोबाईल आणि पत्ता लिहा आणि झोन कार्यालयात जमा करा, असे सांगितले जात आहे. नव्या कर प्रणालीबाबत नागरिकांना माहिती व्हावी आणि त्यासाठी महापालिकेने नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक असताना कर्मचारी मात्र टाळाटाळ करीत अर्ज वाटप करीत आहे. त्यामुळे आलेला अर्ज कसा भरायचा याबाबत नागरिक संभ्रमात आहेत.

या संदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष सुधीर राऊत यांनी सांगितले, नव्या कर प्रणालीनुसार स्वयंमूल्यानिर्धारण कराची माहिती नागरिकांना व्हावी यादृष्टीने अर्ज वाटपाचे काम हाती घेण्यात आले आहे. अर्ज कसा भरायचा आणि त्याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची असल्यामुळे त्यांना ते करावेच लागणार आहे. या संदर्भात माहिती घेण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 4:22 am

Web Title: nagpur municipal corporation to adopt new simplified taxation system
Next Stories
1 सरोलच्या प्रशिक्षण केंद्रात मानसिकदृष्टय़ा तयार होतात लष्कर अधिकारी व जवान
2 मेट्रो विस्तारीकरणामुळे गृहबांधणी क्षेत्राला चालना?
3 सुपरस्पेशालिटीतील एका किडनी प्रत्यारोपणाचा चार हृदयरुग्णांना फटका!
Just Now!
X