प्रभाग क्रमांक १४

मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांसह आमदार निवास असलेला प्रभाग क्रमांक १४ शहरातील अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी ) भागात येतो. या प्रभागात झोपडपट्टीबहुल परिसरासह इतरही काही भागांत कचरा साठवण्याची समस्या असल्याने काही वस्त्यांत अस्वच्छतेचे साम्राज्य दिसते. काही रस्त्यांवर खड्डे असून फुटाळा परिसरात रस्ते लहान असल्याने नागरिकांना त्रास होतो. काही भागांत डुकरांसह माकडांचा त्रास आहे. गोंडटोळीसह फुटाळा परिसरात घरांचे पट्टे वाटले नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

[jwplayer 9AX3hgPE]

शहरात चोवीस बाय सात पाणी योजनेची प्रभावी अंमलबजावणी प्रभाग क्रमांक १४ च्या बहुतांश भागात होत असल्याने पाण्याची फारशी समस्या नाही. परंतु या योजनेमुळे नागरिकांना अवाच्या सवा पाण्याचे बिल आल्याच्याही तक्रारी आहे. गोंडटोळीसह इतर काही भागात पाण्याच्या फुटलेल्या जलवाहिनेचेही बिल संबंधित कंपनीने काही नागरिकांच्या बिलात जोडल्याचा काहींचा आरोप आहे. त्यामुळे काही झोपडपट्टीधारकांना प्रत्येकी हजारोंची बिले आली. या बिलांचा भरणा करण्याची आर्थिक क्षमता या नागरिकांत नसल्याने त्यांना न्याय देणार कोण, असा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.

प्रभागात कचरा साठवण्याची ठिकाणे कमी करण्यात आल्याने भरतनगर येथील शिक्षण कॉलनीसह रामनगर मैदानात कचरा पडून राहत असल्याने नागरिकांना त्रास होतो. गोंडटोळीसह फुटाळाच्या उतार भागातील परिसरात रस्ते लहान असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. तेलंखेडी, प्रियदर्शनी कॉलनीसह सिव्हिल लाइन्सच्या बऱ्याच भागात डुकरांसह माकडांचाही नागरिकांना त्रास होतो. वारंवार महापालिकेला तोंडी तक्रार केल्यावरही त्यावर लक्ष दिले जात नाही. शिक्षितांचा प्रभाग असला तरी येथे नवीन मुलांसह वृद्धांना येथे वाचनासह अभ्यास करण्याकरिता वाचनालयाची सोय नाही.

गोंडटोळीसह फुटाळातील बऱ्याच भागात वारंवार मागणी व आश्वासन मिळाल्यावरही अद्याप नागरिकांना मालकी हक्काचे जमीनपट्टे वाटप करण्यात आले नसल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहे. श्रीमंतांचा भाग असलेल्या ‘करोडपती गल्ली’त नागरिकांना डुकरांचा त्रास असून महापालिकेच्या सिव्हील लाईनच्या शेजारच्या गल्लीत अनेकवेळा कचरा पडून राहतो.  काटोल मार्गावर खेळाचे मैदान, आरोग्य केंद्र केव्हा मिळणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. मरियमनगरातील रेल्वे लाइनच्या खालून जाणारे नाले बंद झाल्याने नेहमीच तुंबतात, तेव्हा पावसाळ्यात येथे नागरिकांना प्रचंड त्रास होतो.

रस्ते चांगले करण्यात यश

सिव्हिल लाइन्स भागात जवळपास सगळेच रस्ते चांगले करण्यात यश आले असून पाण्याची समस्या सोडवली आहे. मोहननगर, खलासी लाइन परिसरात शौचालये बांधून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मरियमनगर भागात रेल्वे लाइन खालून जाणाऱ्या नाल्यांचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून इतरही त्रास दूर करण्याचा प्रयत्न आहे. शक्तिनालावरील अतिक्रमण हटवून त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून देण्याची गरज असून त्याकरिता प्रयत्न करणार आहे. सोबत वीजताराही काही भागात भूमिगत नसल्याने त्यालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे. माकड व डुकरांचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यातही लवकरच यश मिळण्याची आशा आहे.

– प्रगती अजय पाटील, नगरसेविका

वाहनतळांची समस्या 

प्रभाग क्रमांक १४च्या टिळकनगर, सदरसह इतर बऱ्याच भागांत मोठय़ा प्रमाणावर शिकवणी वर्ग भरतात. तेथे वाहनतळांची सोय नसल्याने विद्यार्थी थेट रस्त्यांवर वाहने लावत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. सदरमधील बरेच रस्ते लहान असल्याने येथे नागरिकांना वाहतुकीच्या समस्येला समोर जावे लागते.

प्रभागातील वसाहती

राजभवन परिसर, निर्मला होस्टेल, सदर, गांधी चौक, आझार चौक, गवळीपुरा, गोंड मोहल्ला, खाटिकपुरा, मनपा मुख्यालय परिसर, न्याय मंदिर, व्ही. सी. ए., रेल्वे अधिकारी वसाहत, रेल्वे क्लू, सराफ चेंबर, ऑल सेंट चर्च, टायगर गॅप मैदान, बिजली नगर, तिरपुडे कॉलेज परिसर, गिद्दीखदानचा दक्षिण भाग, आझार नगर, कृष्ण नगर, सीबीडब्लूडी क्वॉटर्स, बालोद्यान, सेंटर पॉइंट स्कूल, एस. एफ. एस. कॉलेज, जपानी गार्डन, रविनगर, भरत नगर, मरारटोली, सी. पी. क्लब, रिझव्‍‌र्ह बँक कॉलनी, तेलंगखेडी परिसर, फुटाळा वस्तीचा काही भाग, टिळक नगर, सिव्हिल लाइन्स, विद्यापीठ परिसर, प्रियदर्शनी कॉलेज, रामगिरी, हायकोर्ट, विभागीय कार्यालय, विजय क्लब, १६० खोल्यांचे गाळे, आमदार निवास, रविनगरचा पूर्व भाग.

 

‘वाचनालयांची गरज’

प्रभागात मोठय़ा प्रमाणावर सुशिक्षित तरुण असून त्यांना अभ्यासासह स्पर्धात्मक परीक्षेकरिता वाचनालयांची गरज आहे. ही संख्या वाढायला हवी. अनेक भागांत कचरा पडून राहत असल्याने आजार बळावण्याची शक्यता नकारता येत नाही. तेव्हा कचरा वेळीच उचलण्यासह विजेच्या भूमिगत वाहिनीकरिता काम होण्याची गरज आहे.

– राजेश लोणारे, मरारटोळी

‘सौंदर्यीकरणावर भर द्या’

प्रभागात रस्ते, पाणीची समस्या जास्त नसली तरी ‘व्हीव्हीआयपी’चा प्रभाग असल्याने येथे सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज आहे. पूर्वीच्या तुलनेत सौंदर्य कमी आहे. माकडांसह डुकरांचा त्रास जास्त असल्याने तातडीने त्यावर नियंत्रणाची गरज असून सदर, टिळकनगर भागात वाहनतळाअभावी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून उपाय शोधायला हवे.

– राजश्री किशोर जिचकार

आरक्षण

अ)  अनुसूचित जाती (महिला)

ब)   अनुसूचित जमाती

क)  नागरिकांचा मागास प्रवर्ग

ड)   सर्वसाधारण (महिला)

[jwplayer y8Pn2zMM]