News Flash

मालमत्ता कर कमी होणार!

 सायबरटेक कंपनीला ५ लाख ३१ हजार ५४२ मालमत्ताचे सर्वेक्षण करायचे होते.

नागपूर महापालिका

वाढीव देयके रद्द, सुधारित पाठवणार; महापालिकेचा निर्णय

वाढीव मालमत्ता कराच्या देयकांमुळे निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी महापालिकेने अखेर ही देयके रद्द करून नव्याने सुधारित देयके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून ज्यांनी वाढीव देयकानुसार कर भरला असेल त्यांची रक्कम पुढील देयकांमध्ये समायोजित केली जाणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सायबरटेककडून चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून १ लाख ३९ हजार नागरिकांना वाढीव मालमत्ता कराची देयके पाठवण्यात आली होती. त्यामुळे मालमत्ता धारकांमध्ये संताप निर्माण झाला होता. अनेकांनी या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर विरोधकांनी सत्तापक्षाला धारेवर धरले होते. बाहेर निदर्शने करण्यात आली होती. हा असंतोष शांत करण्यासाठी प्रशासनाने वाढीव देयकांच्या संदर्भात नागरिकांकडून आक्षेप मागवले होते. आता प्रशासनाने देयकांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सायबरटेक कंपनीला ५ लाख ३१ हजार ५४२ मालमत्ताचे सर्वेक्षण करायचे होते. कंपनीने ३ लाख ८३ हजार मालमत्ताचे सर्वेक्षण केले. त्यात अनेक चुका झाल्या. सायबरटेकचा करार संपल्यानंतर कर विभागाने कोणताच प्रस्ताव तयार केला नाही. उर्वरित मालमत्ताचे सर्वेक्षण थांबले असल्याची कबुली कर समितीचे सभापती अविनाश ठाकरे यांनी दिली.

कर वसुलीवर लक्ष

चालू वर्षांत केवळ १२४ कोटी ५८ लाख लाख वसुली झाली. थकीत वसुलीवर मनपाने लक्ष केंद्रित केले आहे. मोठय़ा थकबाकीदाराची यादी तयार करून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची मोहीम सुरू आहे. आता ५ हजारापेक्षा कमी कर असणाऱ्यावरही महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. या छोटय़ा थकबाकीदारांनाही सहा-सात वर्षांपासून कर भरलेला नाही. अशी संख्या १० ते १५ हजार आहे. अशा सर्व छोटय़ा थकबाकीदारांना नोटीस दिली जाणार आहे. या नोटीस वाटपाचे काम सफाई कामगारांना देण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

दुप्पटीपेक्षा अधिक कर नाही

बांधकाम क्षेत्रफळात बदल नसल्यास निवासी, खुल्या भूखंडासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक कर भरावा लागणार नाही. मात्र, मालमत्तेच्या वापरात व बांधकामाच्या प्रकारात बदल झाला नसेल तरच हा लाभ मिळेल. मालमत्ताचा व भूखंडाचा अनिवासी वापर असेल अर्थात निवासी वापर नसेल व अशा मालमत्तावरील बांधकामाच्या क्षेत्रफळात बांधकामाच्या प्रकारात बदल झाला नसल्यास मालमत्ता धारकांना गेल्यावर्षीच्या मालमत्ता कराच्या तिपटीपेक्षा अधिक कर भरावा लागणार नाही. अर्थात वाणिज्यिक वापर असेल कर गेल्यावर्षीच्या तुलनेत तिपटीपर्यंत करवाढ होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 4:06 am

Web Title: nagpur municipal corporation will reduce property tax
Next Stories
1 राज्यात नागपूर पोलिसांकडे सर्वाधिक काम
2 रेल्वेशी संबंधित समस्या संपल्या?
3 कौटुंबिक न्यायालयात तोडफोड, खुर्ची फेकली
Just Now!
X