आमदार दटके यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप

नागपूर :  महापालिकेत महापौर विरुद्ध आयुक्त असा वाद सुरू असतानाच आता आमदार प्रवीण दटके यांनी एका अधिकाऱ्याशी बोलताना शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप करीत महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दटके यांच्या निषेधार्थ आज सोमवारी काम बंद आंदोलन केले.

भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी रस्त्याच्या कामाबद्दल नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना फोनवरून विचारणा केली. यावर गावंडे यांनी तीन दिवसांपासून आपण रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊ शकलो नाही आणि आज पालकमंत्री, आयुक्त यांच्याशी बैठक असल्यामुळे आजही तिकडे जाऊ शकणार नाही, असे सांगितले. त्यावर दटके यांच्या पारा भडकला व त्यांनी शिविगाळ केली, अशी तक्रार गावंडे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली. यानंतर कामबंद आंदोलन करण्यात आले तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला अधिकारी हजर राहणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना देखील निवेदन देण्यात आले.

यावर प्रतिक्रिया देताना दटके म्हणाले, मी जनतेच्या प्रश्नावर ओरडलो. पण, शिवीगाळ केली नाही. जे अधिकारी वारंवार विनंती करून नगरसेवकांचे ऐकत नाहीत, कधी बैठकीचे कारण सांगतात तर कधी करोनाचे कारण सांगतात.  त्यांच्याशी कुठल्या भाषेत बोलावे?

महापौरांनी माफी मागितली

आमदार दटके यांनी अधिकारी यांच्याशी बोलताना अपशब्दाचा वापर केल्याचा आरोप झाल्यावर महापौर संदीप जोशी यांनी जाहीर माफी मागितली आहे. ते म्हणाले, दटके यांनी स्वत: गावंडे यांची माफी मागितली आहे. शहराचा महापौर या नात्याने दटके यांच्या वतीने मी सुद्धा गावंडे यांची माफी मागतो. अधिकाऱ्यांनी चालविलेले आंदोलन मागे घ्यावे.

माझ्या अस्मितेला धक्का

शिवराळ भाषा वापरल्यामुळे मानसिक त्रास झाला. माझ्या अस्मितेला धक्का बसला. त्यामुळे मी राजीनामा देण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे गेलो. परंतु त्यांनी मला टोकाचे पाऊल न उचलता इतरत्र पदस्थापना मागू शकता, असे सूचवले.  कुणावर कारवाई करावी, कोणी माफी मागावी, असे मी निवेदनात म्हटलेले नाही.

– प्रमोद गावंडे, सहायक संचालक, नगररचना, विभाग.

आंदोलनाला आयुक्तांची फुस – भाजप

महापालिका अधिकाऱ्यांना समाजावून मार्ग काढण्याऐवजी  मुंढे यांनी अधिकाऱ्यांना काम बंद आंदोलन करण्याची फूस लावली, असा आरोप सत्ता पक्ष नेते संदीप जाधव यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. आमदार दटके रागाच्या भरात बोलले. परंतु त्यांनी शिविगाळ केली नाही. प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी प्रकरणाचा निपटारा करणे अपेक्षित होते. मात्र, अधिकाऱ्यांना आंदोलनासाठी त्यांनीच फूस लावली, असे  जाधव म्हणाले.