शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना शहरातील अंतर्गत आणि मुख्य मार्गावरील रस्ते चकाचक व्हावे यासाठी गेल्या तीन महिन्यांत ६०० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. या कामांच्या निविदाही निघाल्या. मात्र, एकाही रस्त्यावर अजून ‘डांबर’ पडले नसल्याचे समोर आले आहे.
स्वच्छतेबाबत शहराचे मानांकन करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या चमूने शहराच्या विविध योजनांचे काम पाहून समाधान व्यक्त केले. शहरातील अनेक वस्त्यांमधील आणि काही वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची अवस्था फारच गंभीर झाली आहे. शहरात ३०० कोटींचे सिमेंट रस्ते तयार करण्यात येणार असून हे काम हिवाळी अधिवेशनानंतर सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्या कामाला अजूनही सुरुवात झाली नाही. गेल्या तीन महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे प्रस्ताव येत असताना त्यासाठी कोटय़वधी रुपये मंजूर केले जात असताना त्याची निविदा काढून संबंधित कंत्राटदाराला काम दिले जाते. मात्र, निविदा काढल्या असताना त्या रस्त्यांवर अजूनही डांबर पडले नसल्याचे समोर आले आहे.
शहरातील अनेक भागातील रस्त्यांची अवस्था फारच गंभीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण टप्या टप्याने केले जात असले तरी पूर्व, दक्षिण, मध्य आणि उत्तर नागपुरातील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. ज्या ठिकाणी सिमेंट रस्ते तयार केले जाणार आहेत, त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार नसल्याचे सांगितले जात नसले तरी सिमेंट रस्ते केव्हा होईल ते सांगता येत नाही. मात्र, तोपर्यंत खराब झालेले रस्ते नागरिकांना वापरावे लागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या परिसरात सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले असले तरी त्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये सिमेंटचे तर सोडाच पण डांबरीकरण करण्यात आलेले नाही. काही वर्षांपूर्वी नागपूर चांगल्या रस्त्यासाठी प्रसिद्ध असताना गेल्या चार वर्षांत मात्र शहरातील अनेक भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर तसेच जानेवारी असे प्रत्येक महिन्यात ७५ कोटींची कामे हाती घेण्यात आली असून येत्या तीन महिन्यात ६०० कोटींच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कुठेच रस्त्याची कामे सुरू झाली नाहीत. डांबरीकरणाची कामे एका विशिष्ट गटाच्या कंत्राटदाराला दिली जात असून ते सर्व भाजपशी संबंधित आहेत. रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर त्याचा अनेकदा दर्जा तपासला जात नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे एका माहिन्यात रस्त्यावरील डांबर निघून त्या ठिकाणी खड्डे दिसू लागले आहेत गेल्या तीन महिन्यात ६०० कोटीच्या रस्त्याच्या निविदा काढल्या असताना त्यातील ४०० कोटीचे निविदा पूर्व, उत्तर, आणि दक्षिण नागपुरातील रस्त्याच्या संदर्भात आहेत. मात्र, त्या भागातील रस्त्यांची सध्याची अवस्था बघता अजूनही त्या ठिकाणी काम सुरू केलेले नाही.

नावालाच ‘ग्रेट’ नागरोड
अशोक चौकापर्यंत सिमेट रस्त्याचे काम पूर्ण झाले असली तरी त्या पुढचे काम मात्र अजूनही सुरू झालेले नाही. अशोक चौक ते घाटरोडपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम जानेवारी सुरू झाला तरी काम सुरू झाले नाही. सध्या अशोक चौक ते मोक्षधामपर्यंत असलेल्या ग्रेट नाग रोडची अवस्था सध्या फारच खराब आहे. वाहन चालकांना त्रास होतो त्यामुळे सध्या तरी हा मार्ग नावाला ‘ग्रेट’ असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांत विविध भागातील रस्त्याच्या निविदा काढल्या असताना काही ठिकाणी काम सुरू झाल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी केला आहे. ज्या कंत्राटदारांना डांबरीकरणाचे काम देण्यात आले, त्यांना मुदत देण्यात आली. त्यांनी त्या मुदतीत चांगल्या दर्जाचे काम केले नाही तर त्यांना देणाऱ्या पैसामध्ये कपात करण्यात येईल, असा इशारा दिला.