राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्याच्या प्रवक्ता व पक्षाचे माजी शहराध्यक्ष अजय पाटील यांच्या पत्नी व विद्यमान नगरसेविका प्रगती पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना या पक्षाकडून महापालिका निवडणुकीची उमेदवारीही दिली जाणार आहे.

अजय पाटील यांची राष्टवादीच्या शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यावर ते पक्षात एकाकी पडले होते. मधल्या काळात पाटील यांचे वडील दिवंगत उत्तमराव पाटील यांचे नाव राजभवन समोरील मार्गाला देण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. तेव्हापासून पाटील दाम्पत्य भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली. प्रगती पाटील या दहा वर्षांंपासून सिव्हील लाईन्स प्रभागातून राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. त्यांनी भाजपकडे याच प्रभागातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. भाजपने ती मान्य केली. गुरुवारी भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी उमेदवारी यादी निश्चित करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत प्रगती पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला.

त्यामुळे पाटील दाम्पत्य लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यासंदर्भात प्रगती पाटील यांना विचारणा केली असता त्यांनीही याला दुजोरा दिला.  राष्ट्रवादीने अजय पाटील आणि प्रगती पाटील यांना विविध पदांवर काम करण्याची संधी दिली होती. प्रगती पाटील या महापालिकेत स्थायी समितीवरही होत्या. पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पक्ष सोडल्यावर ही जबाबदारी प्रगती पाटील यांच्याकडे देण्यात आली  होती. त्यापूर्वी त्या प्रदेश कार्यकारिणीवर होत्या. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.