मुख्यमंत्री फडणवीस यांचा आशावाद

नागपूरमधील मिहान प्रकल्पात साकारलेले विमान देखभाल-दुरुस्ती केंद्र (एमआरओ), टाटा उद्योग समूहाच्या टाल मॅनिफॅक्चरिंगह्ण मध्ये सुरू झालेली विमानांसाठी लागणारी सुटय़ा भागांची निर्मिती (फ्लोअर बीम), जगभरात मालवाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येणारी सुविधा, आणखी एक नव्याने येऊ घातलेले विमान देखभाल-दुरुस्ती केंद्र आणि विमान वाहतूक क्षेत्रातील तेजी लक्षात घेतली, तर भविष्यात नागपूर हे विमान निर्माण उद्योगक्षेत्रात जागतिक पातळीवरील केंद्र म्हणून पुढे येईल, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

मिहान-सेझमधील टाल मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशनह्ण आणि बोईंगच्या संयुक्त प्रकल्पातील फ्लोअर बीमह्णच्या पाच हजाराव्या कंटेनरला फडणवीस यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविली. त्यावेळी ते बोलत होते. या फ्लोअर बीमचा वापर बोईंगच्या विमानात केला जातो. यावेळी टालह्णच्या सुटेभाग निर्मिती विभागाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर बोईंग एशियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश केसकर, बोईंग इंडियाचे अध्यक्ष प्रत्युक्षकुमार, टाल मॅनिफॅक्चरिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खत्री, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके आणि खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.

टालह्ण मध्ये तयार होणाऱ्या जागतिक दर्जाच्या फ्लोअर बीमह्णमुळे नागपूरचे नाव जागतिकस्तरावर पोहोचविले आहे. एअरबससाठी आवश्यक असणारे सुटे भाग तयार करणारी टालह्ण ही जगातील एकमेव कंपनी आहे. इको एअरोस्पेस सिस्टीमसाठी मिहान येथे जागतिकस्तराच्या आवश्यक सर्व सुविधा निर्माण झाल्या आहेत. टाल मॅनिफॅक्चरिंगह्ण हे मिहानसाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर ठरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियाह्णच्या संकल्पनेतील नागपूर हे मेक इन इंडिया फॉर वर्ल्डह्ण म्हणून पुढे येत आहे, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी टाटा उद्योगसमूह, बोईंग आणि विशेषत: दिनेश केसकर यांचे तोंडभरून कौतूक केले. येथे काम करणाऱ्या युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानात आपण कुठेही मागे नाही, हे जागतिक दर्जाचे फ्लोअर बीम तयार करून सिद्ध करून दाखविले आहे. येथे अशा प्रकारचे उत्पादन करण्यासाठी मनुष्यबळ मोठय़ा संख्येने उपलब्ध आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात तेजी आहे. जागतिकस्तरावरील प्रवासी विमान कंपन्या, तसेच त्याची देखभाल-दुरुस्तीसाठी मिहानमध्ये एमआरओचा फायदा या कंपन्यांना होणार आहे. नागपूरच्या एअर इंडियाच्या एमआरओसोबत स्पाइस जेटने देखभाल-दुरुस्तीचा करार केला आहे.

मिहानमध्ये सीप्लेन

नागपूरमध्ये मिहानला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. भारतातील पहिले फॅब युनिट येथे येणार असून, संबंधित कंपनीने याबाबत मान्यतापत्र दिले आहे. सोलरनिर्मिती क्षेत्रातील एक युनिटही येथे सुरू करण्यात येणार आहे. कार्गोहबसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मालवाहतूक सुविधांमुळे येथील उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणे सुलभ होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मिहानमध्ये सी-प्लेन तयार करण्याबाबतही टाटा उद्योगसमूहाने विचार करावा, तसेच संरक्षणक्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचाही लाभ या क्षेत्राला होणार आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. येथील उद्योगांमध्ये जास्तीतजास्त स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वैदर्भीयांचे ऋण फेडण्याची संधी

आपले शिक्षण नागपुरात झाले. बोईंगमध्ये काम करताना या प्रदेशासाठी काही तरी करून ऋण फेडावे, असे नेहमी वाटत होते. बोईंग एमआरओ आणि टाटा उद्योगसमूहाचा फ्लोअर बीम निर्मिती प्रकल्प नागपूरमध्ये सुरू करून हे ऋण फेडण्याची संधी मिळाली, याचे समाधान आहे, असे बोईंगचे उपाध्यक्ष दिनेश केसकर यांनी नमूद केले. मिहानमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असल्याने एअरोस्पेससोबतच सुटे भाग निर्मितीसाठी जागतिक पातळीवर नागपूर येथे एक नवीन दालन सुरू झाले आहे, असे त्यांनी सांगितले.