News Flash

गोठवणाऱ्या थंडीत नववर्षांचे दमदार स्वागत

अनेक हॉटेलांच्या प्रवेश द्वारावर रंगीबेरंगी फुगे आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

१२ च्या ठोक्यावर नृत्य, आतषबाजी; काही हॉटेलांमध्ये वेळेवर प्रवेशासाठी गोंधळ

नागपूर : डीजेच्या आवाजावर ठेका आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नागपूरकरांनी गोठवणाऱ्या थंडीतही नववर्षांचे जल्लोषात स्वागत केले. हॉटेलांमध्ये युवकांना वेळेवर प्रवेश मिळत नसल्याने काही ठिकाणी गोंधळ उडाला.

नववर्षांच्या स्वागतासाठी  अनेक हॉटेलांच्या प्रवेश द्वारावर रंगीबेरंगी फुगे आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मोठय़ा हॉटेलांमध्ये  विशेष पॅकेज तयार करण्यात आले होते. सायंकाळपासूनच फुटाळा तलावावर तरुणाईने गर्दी केली होती. रात्री आठपासूनच सदर, धरमपेठ, सिव्हिल लाईन्स, वर्धा मार्ग, अमरावती मार्ग, हिंगणा या भागातील हॉटेल, धाबे, पब, बार येथे   तरुणाईची लगबग  होती. रात्री १२ वाजताच शहरात एकच जल्लोष करण्यात आला.   काही हॉटेलांमध्ये विशेष डीजे मुंबईवरून आले होते. शहराबाहेर  रिसॉर्टमध्ये कुटुंबांसाठी विशेष सोय करण्यात आली होती.

मेडिकल, मेयोमध्ये डॉक्टर वाढवले

* नावीन वर्षांच्या स्वागतादरम्यान वाढणाऱ्या अपघाती घटना लक्षात घेऊन मेडिकल, मेयो  रुग्णालये सज्ज झाली. दोन्ही रुग्णालयांत प्रशासनाने डॉक्टर वाढवले, अत्यावश्यक औषधांसह सर्जिकल साहित्यांची खरेदी केली, ३० खाटा आकस्मिक अपघात विभागात आरक्षित ठेवण्यात आल्या.

* नवीन वर्षांचे स्वागत करताना काही मंडळी  अतिमद्यप्राशन  करतात. त्यामुळे काहींची प्रकृती बिघडते, अपघातही वाढतात. या रुग्णांना उपराजधानीतील मेडिकल, मेयोत दाखल केले जाते. या रुग्णांना वाचवण्यासाठी मेडिकल, मेयोने ३१ डिसेंबरला रात्रपाळीत डॉक्टर वाढवले होते. मेडिकलला २० तर मेयोला १० खाटा आकस्मिक  आरक्षित ठेवल्या होत्या. काही डॉक्टरांना गरज पडल्यास रात्री तातडीने रुग्णालयात हजर होण्याबाबत सूचनाही करण्यात आली. रात्रपाळीत दोन्ही रुग्णालयात अटेंडन्टसह चतुर्थश्रेणी कर्मचारीही वाढवण्यात आले .

पावसाची साथ

मंगळवारी दुपारी व सायंकाळी शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हॉटेलच्या गार्डनमध्ये नववर्षांच्या स्वगतासाठी केलेली सुविधा बाधित झाली. लॉनमध्ये चिखल झाल्याने अनेकांनी तेथे जाणे टाळले. शिवाय बोचरी थंडी असल्याने अनेकांनी हॉटेलच्या आतच नववर्ष साजरे करण्यासाठी हट्ट धरला. परंतु पावसामुळे उत्साह काही कमी झाला नव्हता.

प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून अतिमद्यप्राशन आणि अपघाताचे रुग्ण वाढत असल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टर वाढवणे, खाटा आरक्षित करणे, अत्यावश्यक औषधांची खरेदी करण्याचे काम प्रशासनाने केले आहे. प्रत्येक रुग्णांना वेळीच उपचाराची काळजी घेतली जाणार आहे.

– डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 2:22 am

Web Title: nagpur people warm welcome new year even in heavy cold zws 70
Next Stories
1 वर्षांच्या शेवटच्या दिवशीही पावसाचा दणका
2 प्रवेश परीक्षा लाखोंची, निवड मात्र हजारांचीच
3 नवीन वर्षांत खगोलीय घटनांची मेजवानी
Just Now!
X