News Flash

दोन बहिणींचे अपहरण करणाऱ्याला सहा तासांत अटक

शाळेसमोरून दोन बहिणींचे अपहरण करणाऱ्याला पाचपावली पोलिसांनी सहा तासांत अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीसह पाचपावली पोलीस.

पाचपावली पोलिसांची कारवाई

नागपूर : शाळेसमोरून दोन बहिणींचे अपहरण करणाऱ्याला पाचपावली पोलिसांनी सहा तासांत अटक केली. त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. कळमेश्वरमधील लोणारा येथून दोघींची सुखरूप सुटका करण्यात आली. सय्यद जुबेर सय्यद रहमत अली (१९) रा. टिपू सुलतान चौक, मेहबूबपुरा झोपडपट्टी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

१४ वर्षीय मुलगी सहावीत तर १६ वर्षीय मुलगी सातवीत शिकते. दोघीही बहिणी आहेत. दोघी जुबेर व विधीसंघर्षग्रस्त बालकाला ओळखतात. बुधवारी सायंकाळी शाळा सुटली. दोघी शाळेबाहेर आल्या. यावेळी जुबेर व विधीसंर्घषग्रस्त बालकाने दोघींना सोबत नेले. शाळा सुटल्यानंतरही मुली परत न आल्याने नातेवाईकांनी दोघींचा शोध घेतला. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एकाचवेळी दोन बहिणी शाळेसमोरून बेपत्ता झाल्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी अपहरण कर्त्यांचा छडा लावण्याचे निर्देश  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना दिले. मेश्राम यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक एस.एस. सुरोशे, महिला उपनिरीक्षक रामटेके, चिंतामण डाखोळे, रविशंकर मिश्रा, राकेश तिवारी, विनोद बरडे, नितीन धकाते यांनी मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांनी शाळेत लागलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली. दोघी एका युवकासोबत जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मुलींच्या आईला दाखवले. तिने मुलींसोबत असलेला युवक हा जुबेर असल्याचे सांगितले. पोलिसांनी जुबेर याचा शोध घेऊन त्याला अटक केली. विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने मुलींना कळमेश्वरमधील लोणारा येथे नातेवाईकाकडे ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांचे पथक लोणारा येथे पोहोचले. मुलींची सुटका करून विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. गुरुवारी पोलिसांनी जुबेर याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची एक दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. लोणारा येथील नातेवाईकाकडे रात्रभर मुलींना ठेवून गुरुवारी सकाळी जुबेर व विधीसंघर्षग्रस्त बालक त्यांना अजमेर येथे नेणार होते. तेथे ते दोघींची विक्री करणार होते, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 4:04 am

Web Title: nagpur police arrest kidnappers of two sisters in six hour zws 70
Next Stories
1 सुधार प्रन्यास अखेर महापालिकेत विलीन होणार
2 महापालिका, प्रन्यासचे १५६ कर्मचारी एनएमआरडीएत
3 कारचालकाच्या घरी जाऊन दंड वसुली
Just Now!
X