वरिष्ठ पोलीस निरीक्षक रफिक बागवानपासून सुरुवात

नोकरीचे ठिकाण किंवा कामाचे स्वरूप पसंत नसल्याने सतत गैरहजर राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची थेट विभागीय चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. या निर्णयाची सुरुवात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रफिक बागवान यांच्या विभागीय चौकशीपासून झाली, हे विशेष.

ठरावीक वर्षांची सेवा पूर्ण झाल्यांनतर पोलीस अधिकाऱ्यांची राज्यभरात बदली होते. बहुतांश अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू होतात, पण काही अधिकारी रुजू न होता परस्पर बदली करून घेतात. काही रुजू होऊन रजेवर जातात.

रुजू होऊन रजेवर जाणे किंवा कुणालाही न सांगता गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशासनाला प्रचंड फटका बसतो. वारंवार गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे त्यांना कुठे सेवा द्यावी, असा पेच निर्माण होतो. त्यांचे काम दुसऱ्याकडे सोपवावे लागते.त्याच्यावरही कामाचा ताण वाढतो.

या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस आयुक्तांनी सतत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला असून अशा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. या कारवाईची सुरुवात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रफिक बागवान यांच्यापासून झाली आहे. मुख्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक त्यांची चौकशी करीत आहेत. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मागील वर्षी सतत सहा महिने गैरहजर

रफिक बागवान यांची सदर पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत बदली करण्यात आल्यानंतर ६ मार्च ते ११ सप्टेंबर २०१६ दरम्यान, गैरहजर होते. त्यानंतर ते गुन्हे शाखेत रुजू झाले. त्यांच्याकडे एका परिमंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली. सहा महिने काम करीत नाही, तोच पुन्हा ३ मार्च २०१७ अचानक कोणालाही न सांगता मुंबईला निघून गेले. अद्यापही ते गैरहजर आहेत.

सतत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा लेखाजोखा तयार करण्यात येत आहे. ही पोलीस विभागाच्या अंतर्गत बाब असून तशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त