‘महिला पोलिसांचा बुद्धय़ांक कमी असतो’, हा पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांनी लावलेला शोध कशाच्या आधारावर लावला. अशा जबाबदार पदावरून बोलणाऱ्या व्यक्तीची बेजबाबदार वक्तव्य केवळ त्यांच्या अधीनस्थ महिलांचाच अपमान करीत नाहीत तर इतर उच्च पदस्थ महिलांचा अपमान करीत असल्याने पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून त्यांनी हे विधान केल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नोकरदार महिला वर्गातून उमटल्या आहेत. पोलीस दलाच्या गलथान कारभारामुळे प्रशासनाला चौथ्यांदा लेखी परीक्षा रद्द करावी लागली. त्याला जबाबदार महिला पोलीस नसतानाही आयुक्तांनी हे विधान केले. लेखी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी विचारलेल्या प्रश्नांचे महिला शिपायी उत्तर देण्यास सक्षम नसतात. कारण त्यांची बौद्धिक क्षमता कमी असते, असे यादव म्हणाले.

निरंतर प्रौढ शिक्षण व विस्तार विभागातील सेवानिवृत्त संचालक डॉ. जयमाला डुमरे म्हणाल्या, पोलीस आयुक्तांचे विधान सपशेल चुकीचे असून त्यांना संधी मिळाली तर स्वत:चे निर्णय त्या स्वत: घेतात. महिला या पुरुषांच्या तुलनेत कमी असतात अशा मानसिकतेतून हे विधान आहे. आज सर्वच मोठय़ा क्षेत्रात उच्च पदस्थ महिला आहेत. मी ३५ वर्षे विद्यापीठात काम केले पण स्वत:चे निर्णय स्वत: घेतले. तयारी करून आवश्यक अभ्यासक्रमांची गरज कुलगुरू आणि संबंधितांना पटवून दिली. मी घेतलेले अनेक निर्णय वरिष्ठांनी मान्यही केले.

नागपूर विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर म्हणाल्या, पोलीस आयुक्तांनी कुठल्या शासन निर्णयाच्या आधारे वरील विधान केले आहे. त्यांच्याकडे असे काही वैद्यकीय पुरावे आहेत काय? तथ्य गोळा केले आहे का? किंवा कुठल्या जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध झाले आहे का? उलट पुरुषांपेक्षा महिलांना ‘सिक्स सेन्स’ असतो, हे सिद्ध झाले आहे. अनेक घटनांचे आकलन आधीच करणाऱ्या महिला असतात. म्हणून आयुक्तांनी अशी बेधडक विधाने कोणत्या वैज्ञानिक अहवालाच्या आधारे केले आहे? कोणतेही सार्वजनिक विधान करताना पुराव्याच्या आधारावर ते बोलायला हवे. शिवाय तुलनाच करायची होती तर आधी पुरुष शिपायांचाही असा काही सव्‍‌र्हे केला आहे का? त्यांच्यापैकीही किती पुरुष शिपायांचा बुद्धय़ांक खालचा आहे, हेही सर्वेक्षणात यायला हवे. पोलीस आयुक्तांनी असे विधान करून त्यांच्या अधिनस्थ महिलांचा अपमान केला आहेच मात्र, इतर उच्च पदस्थ महिलांचाही अपमान केला आहे.