खरे तर, नागपूर पोलिसांचे अभिनंदन करायला हवे! त्यांनी ज्या पद्धतीने विदर्भ क्रिकेट संघटनेसोबत सामना खेळला, मूळ सामना सुरू होण्याच्या आधी हा रडीचा का होईना, पण सामना जिंकण्यासाठी जे डावपेच खेळले, प्रतिस्पध्र्याला नमवण्यासाठी ज्या हुशार चाली रचल्या, चेंडूच्या गतीने नोटीस पाठवण्यासाठी जे गोलंदाज नेमले, अखेरच्या काही तासात कायद्याची फटकेबाजी करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतील जे फलंदाज नेमले, त्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करणे भाग आहे. तमाम भारतीयांच्या नसात क्रिकेट कसे भिनलेले आहे, याचे उत्तम उदाहरण पोलिसांच्या या कामगिरीतून बघायला मिळाले. भारतीय व्यक्ती क्रिकेटसाठी काहीही करू शकतो. संघ पराभूत झाला, तर प्रसंगी जीव सुद्धा देऊ शकतो. नागपूर पोलिसांनी या खेळासाठी ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्यच गहाण ठेवले. पोलिसांनी व्हीसीएसोबत खेळलेला हा सामना संघटित साठमारीचा उत्तम नमुना होता. खरे तर, भारत-इंग्लंडऐवजी याच सामन्याचे थेट प्रक्षेपण व्हायला हवे होते. देशात कायद्याचा गैरवापर कसा करावा, याची शिकवण या प्रक्षेपणातून सर्व प्रेक्षकांना मिळाली असती. कुंपणच शेत कसे खाते, हे प्रेक्षकांना कळले असते. त्यामुळे क्रिकेटसोबतच त्यांच्या ज्ञानात आणखी भर पडली असती.

पोलिसांनी खेळलेल्या या सामन्यात उत्कंठा वाढवणारे सारे घटक होते. मूळ सामना काही तासांवर आलेला असताना आधी २१० पासेस घेणारे उच्च दर्जाचे अधिकारी कम् खेळाडू यात होते. नंतर ते पासेस परत करत पाचशे पासेसची मागणी करणारेही त्यात होते. पासेस वाढवून दिले नाहीत, तर नोटीसा देणारे, गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचा खेळ करणारे व ती खरी करून दाखवणारे त्यात होते. कसलाही पास जवळ नसताना गणवेशाचा रुबाब दाखवत थेट वातानुकूलित कक्षात बसून खेळाचा आनंद घेणारे आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेचे नाव घेत स्वत:चे व स्वत:च्या कुटुंबीयांचे भले करणारेही यात होते. हे सारे बघून नागपूर पोलिसांची क्रीडाभिरुची किती उच्च दर्जाची आहे, याचा अनुभव केवळ व्हीसीएच नाही, तर अनेकांना आला. मूळ भारतीय संघाला मागे ठेवून या पोलीस दलातील अधिकाऱ्यांनाच क्रिकेटच्या मैदानात उतरवण्यावर आता संघटनेने विचार करावा, अशीच लाजबाब ही खेळी होती. तसाही भारतीय संघ मैदानात प्रतिस्पध्र्याकडून मारले जाणारे टोमणे व शेरेबाजीमुळे हैराण असतो. विशेषत: आस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना तर भारतीय खेळाडू या ‘स्लेजिंग’मुळे भांबावून जात असल्याचे अनेकदा दिसले आहे. अशा वेळी नागपूर पोलीस दलातील या दणकट खेळाडूंचा विचार आता संघटनेने जरूर करावा. हे कायदा मुठीत ठेवणारे खेळाडू शेरेबाजी करणाऱ्यांना मैदानावरच नोटीसा देऊ शकतील, गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देतील, मैदानाबाहेर निघ, तुला भारतीय कायदा काय असतो ते दाखवतो, असा दम भरू शकतील. त्यांच्या या कृतीमुळे विदेशी संघ पार गपगार होईल, त्याचा परिणाम निकालावर होईल व भारत जिंकेल. पोलीस दलातील भिडू हे सहज करू शकतील. कारण, त्यांनी जामठय़ाच्या मैदानाबाहेर राहून आपले उपद्रवमूल्य सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे बीसीसीआयने आता काही शांत खेळाडूंना बाहेर काढून या दलातील खेळाडूंचा समावेश करावाच. तशी आग्रहाची विनंती विदर्भाची संघटनाही करणार आहे म्हणे!

जामठय़ात पोलिसांनी खेळलेला सामना बघून आता या संघटनांनी न्यायालयात जाण्याऐवजी प्रत्येक शहरात एक सामना पोलिसांसाठीच कसा आयोजित करता येईल यावरही विचार करावा. सामना बघण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांकडे असल्यामुळे त्यांना आधी खूष करणे हे या संघटनांचे कर्तव्यच ठरते. आधी राजे-महाराजांच्या काळात त्यांना रिझवण्यासाठी खेळ खेळले जायचे. राजा खूष तर प्रजा खूष, अशी पद्धत त्याकाळी रूढ होती. या पद्धतीतील प्रजा खूष हे वाक्य केवळ कागदावर गृहीत धरून चालावे लागायचे. आता राजाची जागा पोलिसांनी घेतली आहे. सुरक्षेचे पैसे भरूनही त्यांना खूष करावे लागते, हे जर या संघटनांना कळत नसेल, तर त्यांनी सरळ देश सोडून जावे. भारतीय कायदा हा सामान्यांसाठी आहे, या खोटय़ा प्रचारात कुणीही अडकून राहू नये. किमान, या संघटनांनी तर नाहीच नाही, हा बोध या जामठय़ाच्या बाहेर रंगलेल्या सामन्यातून साऱ्यांना मिळाला आहे. कायद्याचा गैरवापर हा समाज व न्यायालयांसाठी चिंतेचा विषय असेल, पण तो आमच्यासाठी नाही, हे नागपूर पोलिसांनी या कृतीतून दाखवून दिले आहे. आजवर एखादा अधिकारी वा कर्मचारी गैरवापर करायचा, आता तो संघटितपणे, अगदी टोळी तयार करून करता येऊ शकतो, हेही पोलिसांनी यातून सर्वाना समजावून दिले आहे. गणवेश धारण करणाऱ्या प्रत्येकाला कुठेही डोकावण्याचा, घुसखोरी करण्याचा हक्कआहे व तो हक्क कायद्याच्या कक्षेत कसा बसणारा आहे, हे पटवून देण्याचे कौशल्य सुद्धा या वर्दीधाऱ्यांमध्ये आहे, हेच यातून सिद्ध  झाले आहे. उपराजधानीतील गुंडांना वठणीवर आणण्याची भाषा करणारे, अनेक गुंडांवर मोक्का लावणारे, गुन्हेगारी कमी करण्यासाठी अहोरात्र झटणारे हेच ते अधिकारी आहेत, ज्यांनी फुकटात व अतिक्रमण करून सामना तर बघितलाच आणि व्हीसीएवर गुन्हेही दाखल केले. आता खरे तर, या शहरातील अनेक नामांकित संघटनांनी या अधिकाऱ्यांची ठिकठिकाणी भाषणे ठेवायला हवी, कायद्याचा गैरवापर कसा करावा, हे त्यांच्याकडून शिकून घ्यायला हवे. शिवाय, त्यांचा जाहीर सत्कार करायला हवा. कारण, अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांचीच या देशात चलती आहे. अशाच व्यक्तींना समाजात नामवंत म्हणून मिरवले जाते व भोळा समाजही त्यांना डोक्यावर घेत असतो. ज्या ब्रिटिशांनी देशाला कायदा दिला, त्याच ब्रिटिशांविरुद्धच्या सामन्यात त्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचे महान काम या बाहेर खेळल्या गेलेल्या सामन्यातून केल्याबद्दल नागपूर पोलिसांचे पुन्हा एकदा अभिनंदन! या दुर्दैवी सामन्यात पंच नव्हता. आता अ‍ॅक्शन रिप्ले बघून पंचांची भूमिका बजावण्याची पाळी न्यायालयावर आली आहे. मैदान व मैदानाबाहेरच्या सामन्यात इतकाच काय तो फरक.

devendra.gawande@expressindia.com