दोन आरोपींना अटक, एक फरार

नागपूर : महिनाभरापूर्वी एका तरुणाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकण्यात आला होता. या प्रकरणात कोणताही पुरावा नसताना गुन्हे शाखा पोलिसांनी खुनाचा छडा लावला व दोन आरोपींना अटक केली. दोन हजार रुपयांच्या वादातून तरुणाचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे.

महेश ऊर्फ मुकेश भय्यालाल खरे (२९) रा. राजीव गांधीनगर, यशोधरानगर आणि शेख सलमान अब्दुल रहीम शेख (२५) रा. भामत टाऊन, नवीन येरखेडा, कामठी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, तर अनिल रिगवेदी नावाचा तिसरा आरोपी फरार आहे. शेख मतीन ऊर्फ माजिद जाकीर मतीन (३०) रा. मालेगाव, तेल्हारा, अकोला असे मृताचे नाव आहे.

अविवाहित मतीन दीड वर्षांपासून यशोधरानगर कामठी मार्गावर एकाकडे कुल्फी विकायचा. याकूब शाह दर्गाजवळ दररोज सायंकाळी तो जायचा. यातून त्याची ओळख आरोपींशी झाली. आरोपीपैकी महेश हा ऑटोरिक्षा चालवतो, तर सलमान हा शेळीपालनाचा व्यवसाय करतो. काही महिन्यांपूर्वी आरोपी महेशने मतीनकडून दोन हजार रुपये उसणे घेतले होते. हे पैसे तो परत मागण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी इभ्रत काढायचा. याचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी १३ जुलै २०१९ च्या रात्री मतीनला दारू पिण्याकरिता दग्र्याजवळ बोलवून दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर मृतदेह एका पडीक विहिरीत फेकून दिला.

या प्रकरणात  पोलिसांकडे कोणताच पुरावा नव्हता, तरीही पोलिसांनी परिश्रम घेऊन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली, अशी माहिती पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी पत्रपरिषदेत दिली.