आर्थिक स्थिती बिकट असल्याने रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश केल्याच्या दुसऱ्याच वर्षांत नागपूर रेल्वेने मालवाहतुकीत उत्तम कामगिरी केली असून सरलेल्या आर्थिक वर्षांत २८५७.२० कोटींचे घवघवीत महसूल रेल्वेच्या तिजोरीत गोळा केला आहे.

भारतीय रेल्वे प्रवासी वाहतुकीसाठी ओळखली जात असली तरी रेल्वेला खरे उत्पन्न मालवाहतुकीतून होत असते. प्रवासी गाडय़ांवरील मनुष्यबळ आणि लागणारे संसाधन बघता ५० टक्केही खर्च त्यातून भरून निघत नाही. मालवाहतुकीतून ही तूट भरू काढली जाते. यामुळे  मालवाहतूक वाढवण्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून सर्व विभागांना आर्थिक वर्षांच्या प्रारंभी सूचना दिल्या जातात. नागपूर रेल्वेने यंदा त्यांना मिळालेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक मालवाहतूक करून विक्रम केला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ४४.२ टक्के मालवाहतुकीत वाढ झाली आहे. यातून रेल्वेला २८५७.२० कोटी रुपयांचे महसूल मिळाले आहे. २०१६-२०१७ या आर्थिक वर्षांत १९८१.६० कोटी रुपये उत्पन्न होते. रेल्वेने कोळसा, सिमेंट आणि लोखंड वाहतुकीसाठी विशेष प्रयत्न केले. संबंधित अधिकारी, व्यापारी, व्यावसायिकांशी नियमित चर्चा केली आणि त्यांना रेल्वे वाहतूक करण्यास राजी केले. अंबुजा सिमेंटमुळे चंद्रपूरजवळील टाडाळी शुड्स शेडमधून पुन्हा मालवाहतूक सुरू झाली. वर्षभरात ३५ मालगाडय़ा येथून भरण्यात आल्या. यातून रेल्वेला ९.१३ कोटी रुपये महसूल मिळाले.

आयर्न अँड स्टिल वाहतूक देखील वाढली. वर्धा आणि कळमेश्वर येथील व्यावसायिकांनी रस्ता मार्गे होत असलेली वाहतूक रेल्वेकडे वळवली. यामुळे कळमेश्वार येथून १८, वर्धा येथून १४ आणि बुटीबोरी येथून दोन मालगाडय़ा भरण्यात आल्या. रेल्वेने यातून ८.४० कोटी रुपये महसूल प्राप्त केला.