स्थानकावरील प्राथमिक सुविधांचा बोजवारा

नागपूर स्थानकाला आधी वर्ल्ड क्लास म्हणून आणि आता पुनर्विकसित करण्याचा संकल्प रेल्वेने सोडला आहे. हा पुनर्विकास होईल तेव्हा होईल, परंतु सद्यस्थितीत नागपूर रेल्वेस्थानकावरील फलाटांची अवस्था बघता प्राथमिक सोयी-सुविधांवर नियमित होणारा खर्च खरच होतो का, असा प्रश्न पडावा, असे चित्र तेथे आहे. सर्वच प्रमुख फलाटांची चाळणी झाली असून ते प्रवाशांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरातून देशाच्या चारही दिशांना गाडय़ा धावतात. यामुळे सर्वोत्तम सुविधा नागपूर स्थानकावर असल्याचा दावा प्रशासन नेहमीच करते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. फलाट क्रमांक एकवर अधिकाधिक सुविधा पुरवण्यावर प्रशासनाचा भर असतो, परंतु गेल्या सहा महिन्यांपासून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. प्रवासी जेथून गाडीत चढतात, त्या भागातील टाईल्स निघाल्या आहेत. एका फलाटावर तर चक्क मोठा खड्डा पडला आहेत. दोन आणि तीन क्रमांकाच्या फलाटावर पाणी वाहते.

घाईगडबडीत गाडीत चढण्याच्या वेळी प्रवाशांचा त्यावरून पाय घसरण्याचा धोका असतो. फलाट क्रमांक सहावर गाडीत चढण्याचा भागातील टाईल निघून त्याखालील लोखंडीपट्टी  बाहेर आली आहे. त्यात पाय अडकून प्रवाशांना अपघात होण्याची शक्यता आहे. नागपूर रेल्वे स्थानकाचा फेरफटका मारला असता, बहुतांश सर्व फलाटांची अवस्था वाईट असल्याचे दिसून आले.

काही ठिकाणी टाईल्स फुटल्या आहेत. त्या ठिकाणी खड्डे पडले असून पाणी साचले आहे. फलाट क्रमांक सहा आणि सातवर सर्वसामान्यांना परवडेल, असे जनआहाराची व्यवस्था नाही. अशी व्यवस्था फलाट क्रमांक एकवर आहे. साधारणत: गाडीला पाच ते सहा मिनिटांच्या थांबा असतो. एवढय़ा वेळेत प्रवाशांना फलाट क्रमांकावर येऊन गाडी सुटण्याच्या आत परत जाणे शक्य नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नागपूर स्थानकावरील फलाट क्रमांक चार आणि पाच क्रमांकाच्या फलाटावर संत्रा मार्केटकडून येताना दोन पादचारी पुलांना जोडण्यासाठी करण्यात आलेला मार्ग घसरगुंडीपेक्षा कमी नाही. येथून चालताना अनेक प्रवासी  धावपळीत  तोल जाऊन पडल्याच्या घटना घडल्या आहेत, असे स्थानकावरील कर्मचारी सांगतात.