मुख्यमंत्री मित्राची प्रवाशांच्या लुटीची रेल्वेत तक्रार

रेल्वेस्थानकावर बॉटलबंद पाणी असो वा खाद्यपदार्थ त्याच्या गुणवत्तेवर कायम प्रश्नचिन्ह लागले जाते आणि त्याचे दर बाजार भावापेक्षा अधिक आकारण्यात येते, अशी कायम प्रवाशांची तक्रार असते, परंतु परिस्थिती काही सुधारत नसल्याचे पुन्हा दिसून आले आहे. आता मुख्यमंत्री मित्र यांनी यासंदर्भातील तक्रार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केल्याने पुन्हा रेल्वेस्थानकावर फळांच्या किमतीचा मुद्दा चर्चिला जात आहे.

नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर १० रुपये डझनची संत्री ४० रुपयांत दहा नग, १५ रुपये डझनची केळी ५० रुपये डझनप्रमाणे आणि ६० रुपये किलोची द्राक्षे १२० रुपये दराने विक्री करून प्रवाशांची लूट करण्यात येत असल्याची तक्रार मुख्यमंत्री मित्राने नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाकडे केली आहे. २० मार्चला सकाळी ११ वाजता एका नातेवाईकाला सोडायला गेलो असता फळ खरेदी केल्यावर कळले की, येथील फळ विक्रेते बाजार भावापेक्षा कितीतरी अधिक दराने फळ विकत आहेत.

फ्रूट कॉन्ट्रक्टर आणि रेल्वे अधिकारी, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या संगनमताने हा व्यवहार चालू आहे. निकृष्ट दर्जाचे फळ आणि तेही बाजार भावापेक्षा अधिक दराने विकण्यात येत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा आहे. पाच-सहा मिनिटांचा थांबा असल्याने घाईघाईने फळ खरेदी केले जातात. त्याचा फायदा घेऊन प्लास्टिक पिशवीत बांधून ठेवलेली फळे ग्राहकांना देतात. त्यात निकृष्ट दर्जाचे फळे असतात. नागपूर रेल्वेस्थानकावर फ्रूट कॉन्ट्रक्टर मनेश्वर रघुवीर प्रसाद साहू यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दराने फळ विक्री करून ग्राहकांना लुटण्यात येत आहे. शिवाय येथे अनधिकृत फळ विक्रेते आहेत. त्यांच्याकडून निकृष्ट दर्जाचे तसेच अधिक दराने फळे विक्री केली जात आहे, परंतु सर्व अधिकारी, आरपीएफ आणि जीआरपी दुर्लक्ष करीत आहेत.

फळांच्या दरावर नियंत्रण आणून तसेच दर निश्चित करून रेल्वेस्थानकावर विकण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मित्र अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्य़ाचे मुख्यमंत्री मित्र नीलेश नागोलकर यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर अव्वाच्या सव्वा दरात फळ विक्री करून प्रवाशांची लूट केली जात असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना सांगितले. मुख्यमंत्री मित्र अभियानांर्तगत मुख्यमंत्री मित्र तयार करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून सोशल ऑडिट करण्यात येत आहे. महाराष्ट्र भाजपचा हा उपक्रम आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात मुख्यमंत्री मित्र नियुक्त करण्यात आले. मुख्यमंत्री मित्रांना मोबदला दिला जात नाही. विविध शासकीय आस्थापनात वेळ घालवून तेथे जनसामान्यांना होणारा त्रास, त्यांच्या समस्या समजून घेतात. त्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली जाते. दरम्यान, १० रुपयांना एक डझन संत्री आणि १५ रुपयांना एक डझन केळी मिळत असल्याचा मुख्यमंत्री मित्राचा दावा हास्यास्पद असल्याचे रेल्वेस्थानकावरील कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, रेल्वेने विचाराअंती दर निश्चित केले असून ते योग्य आहे. यासंदर्भात कुणाचा आक्षेप असल्याने स्टेशन व्यवस्थापकाकडे नोंदवता येते. त्यावर रेल्वे प्रशासन योग्य कार्यवाही करेल, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले.

‘नागपूर रेल्वेस्थानकावरील फळांचे दर स्टेशन मास्टर निश्चित करत असतो. भरमसाठ दराने फळ विकून ग्राहकांचे खिसे कापण्याचे काम रेल्वे अधिकारी, फळ विक्रेते आणि पोलीस यंत्रणा करीत आहे. प्रत्येक पातळीवर कमिशन नसल्याचे काही विक्रेत्यांशी बोलल्यावर समजले.’

नीलेश नागोलकर, मुख्यमंत्री मित्र