महाव्यवस्थापकांची माहिती : संरक्षण, एस.टी.ची जागा घेणार

नागपूर रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे (वर्ल्ड क्लास) नव्हे पण सर्वंकष विकसित केले जाईल. त्यासाठी स्थानकाच्या शेजारची एसटी महामंडळाची आणि संरक्षण दलाची जागा घेण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र शर्मा यांनी दिली.

शर्मा हे वार्षिक निरीक्षणासाठी नागपुरात आले होते. त्यांच्यासोबत सुरक्षितता आयुक्त देखील होते. आमला ते नागपूर खंड, रुळांची देखभाल-दुरुस्ती आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकाचा विकास आणि नागपुरात प्रस्तावित प्रकल्प आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर रेल्वेस्थानकाला विकसित करण्याची कल्पना मांडली. त्यानुसार स्थानकाच्या शेजारची संरक्षण खात्याची जमीन तसेच एस.टी. महामंडळ, मध्यप्रदेश एस.टी. महामंडळाची जमीन ताब्यात घेऊन एका सर्वंकष स्थानक विकासाच्या योजनेला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे, असे शर्मा म्हणाले.

प्रवाशांच्या सुविधांची कामे सुरक्षितता निधीतून केली जात आहेत. त्यामुळे फिरते जिने किंवा इतर सुविधा करण्यास निधीची अडचणी राहिलेली नाही. आवश्यक तेथे फिरते जिने लावण्यात येत आहेत. याशिवाय मध्य रेल्वेने वीज बचत तसेच पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी सौर ऊर्जेवर भर दिला आहे. पहिल्या १० मेगाव्ॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या मार्गावर ‘पॅसेंजर ट्रेन’ सुरू आहेत, त्या मार्गावर ‘मेमू’ ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई ते कोलकाता आणि मुंबई ते चेन्नई या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या गाडीची गती १६० किमी प्रतितास राहणार आहे. हळूहळू संपूर्ण देशात सेमी हायस्पीड चालवण्यात येतील. याशिवाय प्रवासादरम्यान वापरात येणारे चादर, टॉवेल, ब्लँकेट धुण्यासाठी स्वयंचलित यंत्र नागपुरात सुरू करण्यात येत आहे. याचे काम सुरू असून येत्या मार्चपर्यंत मेकानाईज्ड लॉन्ड्रीचे काम सुरू होईल. मध्य रेल्वे नागपूर आणि पुणे येथे अशी सुविधा करण्यात येत आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

पाणी प्रकल्पाचे काम जूनमध्ये पूर्ण

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनचा (आयआरसीटीसी) नीर बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम नागपुरातील बुटीबोरी येथे सुरू आहे. येत्या जूनपर्यंत तो सुरू होईल. आयआरसीटीसीचा स्वत:चा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण मध्य रेल्वेत केवळ रेल्वे नीरचे पिण्याचे पाणी रेल्वेस्थानक आणि रेल्वे गाडय़ांमध्ये मिळेल, अशी व्यवस्था केली जाईल. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची क्षमता ७२ हजार लिटर प्रतिदिवस आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०१७ पर्यंत सुरू करण्यात येणार होता, परंतु आता जून २०१९ पर्यंत सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत आठ कोटी रुपये आहे.