करोनाशी झुंजणाऱ्या नागपूरकरांना मोठा दिलासा

नागपूर : करोना महामारीच्या  काळात प्रत्येक आवश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवत असताना गुरुवारचा दिवस त्याला  अपवाद ठरला.  गुरुवारी ६१ हजार लस साठा, १०६ मे.टन प्राणवायू आणि ४ हजार ४८५ रेमडेसिविर इंजेक्शन  नागपूर जिल्ह्य़ासाठी प्राप्त झाले.

करोना  महामारीला तोंड देताना जिल्हा प्रशासनाला औषध, प्राणवायू आणि लस तुटवडय़ालाही सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीका होत होती. तरीही शक्य ते सर्व प्रयत्न करून जास्तीत जास्त आवश्यक बाबी जुळवण्याचा प्रयत्न करीत होते. त्याला टप्प्याटप्प्याने यश येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यतील लसीकरणासाठी  ६१ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ४५ हजार कोविशिल्ड तर १६ हजार कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. नव्याने प्राप्त झालेल्या १६ हजार कोव्हॅक्सिनमधून ग्रामीण भागातील सावनेर, कामठी येथील केंद्रांवर तर नागपूर शहरातील महाल, छापरू स्कूल, मानेवाडा यूपीएससी या केंद्रावर १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण केले जाणार आहे. अन्य ४५ हजार लसीच्या माध्यमातून जिल्ह्यतील ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. तसेच प्राणवायूची कमतरता लक्षात घेता ओडिशातून प्राणवायू मागवण्यात आला आहे. बुधवारी चार टँकर नागपुरातून ओडिशाकडे वायुदलाच्या विमानाने रवाना करण्यात आले होते. गुरुवारी पुन्हा चार टँकर पाठवण्यात आले. गुरुवारी जिल्ह्य़ासाठी १०६ मे.टन प्राणवायू प्राप्त झाला. दरम्यान, जिल्ह्यासाठी गुरुवारी  एकूण ४ हजार ४८५ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले. शहरातील १५६ तर ग्रामीणमधील ४९ शासकीय व खाजगी रुग्णालयांना रेमडेसिविरचे वाटप करण्यात आले.