जनजीवनावर परिणाम, रस्ते ओस
चार दिवसांपूर्वी पावसाचा हलकासा शिडकावा आला आणि तापमानाचा पारा थोडासा खाली घसरला. दोन दिवस ही स्थिती कायम राहात नाही तोच तापमानाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम आता नागरिकांवरसुद्धा जाणवू लागला असून रस्त्यावरच उन्हाने चक्कर येण्यासारखे प्रकार घडायला सुरुवात झाली आहे. सलग दोन दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्याने पंचेचाळिशी गाठल्याने नागपूरकर चांगलेच धास्तावल्याचे चित्र रस्त्यांवरच्या कमी झालेल्या वर्दळीवरून दिसून येत आहे.
साधारणपणे मे महिन्यात उन्हाची दाहकता जाणवण्यास सुरुवात होते, पण एप्रिल संपायला दहा दिवस बाकी असतानाच पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला. तो आणखी चढल्यास नागपुरातली हिरवळसुद्धा उन्हाची दाहकता कमी करण्यास अपुरी पडेल, असे आता बोलले जात आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमानाने पंचेचाळिशी गाठली होती. मात्र, दरम्यानच्या कालावधीत पडणाऱ्या पावसाने उन्हाची दाहकता एवढी जाणवली नाही. यावर्षी एप्रिलच्या मध्यान्हातच पारा ४५ अंश सेल्सिअसवर गेला आणि उन्हाची काहिलीसुद्धा प्रचंड वाढली. सात वषार्ंपूर्वी एप्रिल महिन्यात तापमानाने ४७ अंश सेल्सिअस पार केले होते. यावर्षी एप्रिल संपायला अजून आठवडा बाकी आहे, त्यामुळे सात वषार्र्पूर्वीचा विक्रम यावेळी तुटणार तर नाही ना, अशीही भीती आता व्यक्त केली जात आहे. हवामान अभ्यासकांनीच नव्हे तर हवामान खात्यानेसुद्धा यावेळी तापमान चढेच राहणार आणि मे महिन्यात ते अधिक असणार असा अंदाज दिला आहे. त्याची प्रचिती आता येऊ लागली आहे.
एरवी माणसांच्या गर्दीने गजबजणारे नागपूरचे रस्ते आता ओस पडण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी ८ वाजताच सूर्यनारायणाच्या दर्शनातून उन्हाचा अंदाज येतो. त्यातूनच बाहेर पडायचे की नाही, खूप महत्त्वाचे काम असेल तरच पडायचे असा विचार प्रत्येक घरातली व्यक्ती करताना दिसून येत आहे. अजनीचा पूल असो वा सीताबर्डीचा उड्डाणपूल, कायम वाहनांनी गजबजलेल्या या रस्त्यांवर आता दुपारच्या सुमारस वाहने दिसून येत नाहीत. विकासाच्या दिशेने होणाऱ्या वेगवान वाटचालीत सिव्हिल लाईन परिसरात वगळता शहरात हिरवळ आता जाणवेनासी झाली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत ही परिस्थिती यापुढेही सरकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्षणाचा विसावा
उन्हं वाढत असले तरीही याच उन्हाच्या भरवशावर उदरभरण करणारे, सरबत विकणारे, बर्फगोळा विकणारे अशा लोकांनी प्रामुख्याने वाहतुकीचे दिवे असणाऱ्या चौकात आपली दुकाने थाटली आहेत. वाहनधारकसुद्धा वाहतुकीच्या लाल झालेल्या दिव्यानंतर मिनिटाभरात या थंडपेयाचा आस्वाद घेत आहेत. प्रामुख्याने अजनी पुलाजवळ हे दृश्य अधिक प्रमाणात दिसून येते. ठेवल्यावर रस विकणाऱ्यांचीही संख्या आता वाढू लागली आहे. अवघ्या काही क्षणाचा का होईना, ते हा विसावा घेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur records all time high temperature affected public life
First published on: 23-04-2016 at 02:54 IST