३४ मृत्यू; १,२१५ नवीन बाधितांची भर; चाचण्यांची संख्या पुन्हा ७,११७ वर

नागपूर : जिल्ह्य़ात आज मंगळवारी एकीकडे करोना चाचण्या वाढल्या असतानाच दुसरीकडे दिवसभरात नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने प्रशासनाला आंशिक दिलासा मिळाला. याशिवाय २४ तासांत  ३४ मृत्यू नोंदवण्यात आले.

सोमवारी केवळ २ हजार ७०१ चाचण्या झाल्या होत्या. परंतु आज  चाचण्यांची संख्या वाढून ती ७ हजार ११७ वर पोहचली. त्यानंतरही जिल्ह्य़ात केवळ १ हजार २१५ नवीन बाधितांची  भर पडली. त्यात शहरातील ९५३, ग्रामीणचे २५४, जिल्ह्य़ाबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरातील चाचणीच्या तुलनेत नवीन बाधितांचे प्रमाण केवळ १७.०७ टक्के आहे. दरम्यान, या नवीन बाधितांमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ६१ हजार २४४, ग्रामीण १५ हजार ३६१, जिल्ह्य़ाबाहेरील ४२५ अशी एकूण ७७ हजार ३० वर पोहचली आहे.

२४ तासांत शहरात १८, ग्रामीण  ८, जिल्ह्य़ाबाहेरील ८ असे एकूण ३४ मृत्यू झाले. दिवसभरात शहरात १ हजार १२०, ग्रामीणला २९८ असे एकूण १ हजार ४१८ जण करोनामुक्त झाले. दिवसभऱ्यातील बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या २०३ ने अधिक  आहे. नवीन करोनामुक्तांमुळे  शहरातील बरे होणाऱ्यांची संख्या ४९ हजार २४३, ग्रामीण ११ हजार ८७२ अशी एकूण ६१ हजार ११५ वर पोहचली आहे.   करोनामुक्तांचे प्रमाण ७९.३३ टक्के झाले आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या १३,४४३ वर

शहरात ९ हजार ९३१ तर ग्रामीणला ३ हजार ५१२ असे एकूण १३ हजार ४४३ सक्रिय करोनाबाधित  आहेत. यापैकी ३ हजार ६८८ बाधितांवर  उपचार सुरू आहेत.  मंगळवारी दुपापर्यंत १ हजार २१५ जणांवर उपचाराची प्रक्रिया सुरू होती.  सुमारे ८ हजार ५४० च्या जवळपास रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

करोना लसीचा दुसरा टप्प्यातील दुसरा डोज देणार

स्वदेशी बनावटीच्या भारत बायोटेक कंपनीकडून निर्मित करोना लसीचा दुसऱ्या टप्प्यातील ५५ जणांना ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान दुसरा डोज डॉ. गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील केंद्रात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दोनदा लस दिलेल्यांमध्ये एकही गुंतागुंत  नसल्याने लसीचे सकारात्मक परिणाम आढळून आले आहेत. नागपुरात कोव्हॅक्सिन लसीवर चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला डोस दिल्यावर संबंधित स्वयंसेवकांवर सलग २८ दिवस  तज्ज्ञांकडून लक्ष दिले जात आहे. दर दिवसाला प्रत्येकाची चाचणी होत आहे. ही लस देऊन सध्या २० दिवस लोटून गेले आहेत. आतापर्यंत कोणालाही एकही संसर्ग आढळला नाही. त्यातच  दोन महिन्यांपासून  गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटीतील दीडशेवर व्यक्तींना लस देण्यात आली. यात कोणाला कोणताही त्रास जाणवला नाही. या लसीचे पहिल्या टप्प्यातील ५५ व्यक्तींवरील निरीक्षणही सकारात्मक दिसून आले होते, असे गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले.

विदर्भातील (२९ सप्टेंबर) मृत्यू

जिल्हा                   मृत्यू

नागपूर                   ३४

वर्धा                      ०४

चंद्रपूर                   ०१

गडचिरोली             ००

यवतमाळ               ०८

अमरावती              ०३

अकोला                 ०३

बुलढाणा               ०२

वाशीम                   ०२

गोंदिया                   ०२

भंडारा                   ०९

एकूण                    ६८