शहरात आणखी सहा मृत्यू; २४ तासांत १५१ नवीन बाधितांची भर

नागपूर : मेडिकल आणि मेयो रुग्णालयांत आणखी सहा जणांचा करोनाने प्राण घेतला. या नवीन मृत्यूंमुळे आजपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांत नोंदवलेल्या बाधितांच्या बळींची संख्या ९८ वर पोहचली आहे. याशिवाय शहर  व ग्रामीण भागात २४ तासांत नवीन १५१ करोना बाधितांची भर पडली.

मेयोत दगावलेल्या रुग्णामध्ये तुमडीपुरा, कामठी येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. तिला २७ जुलैला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने मेयोत दाखल करण्यात आले. तिला मधुमेहही होता. २७ जुलैला मध्यरात्री तिचा मृत्यू झाला. मेडिकलमध्ये तब्बल पाच मृत्यू नोंदवले गेले. यापैकी एक शहरातील टेका नाका बस्ती येथील ७२ वर्षीय पुरुष आहे. त्यांना २५ जुलैला दाखल करण्यात आले. २८ जुलैच्या पहाटे त्यांचा मृत्यू झाला. कडबी चौक, संजीवन सोसायटीतील ५४ वर्षीय पुरुषाला २६ जुलैला दाखल करण्यात आले. त्यांचा २८ जुलैला मृत्यू झाला. बुलढाणातील ८५ वर्षीय व्यक्तीला २७ जुलैला दाखल करण्यात आले. २८ जुलैला त्यांचा मृत्यू झाला.

अकोलातील ५० वर्षीय पुरुषाला २८ जुलैला करण्यात आले.  काही तासातच त्यांचा मृत्यू झाला.

आणखी एका ७६ वर्षीय क्तीचाही मृत्यू मेडिकलमध्ये नोंदवला गेला. त्याला कुणाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याची २५ जुलैला चाचणी केली असता करोना असल्याचे निदान झाले. त्यांना मेडिकलमध्ये हलवले गेले. येथे २८ जुलैला दुपारी  त्यांचा मृत्यू झाला.

२४ तासात ग्रामीण भागात नवीन ५७ तर शहरी भागात ९४ बाधितांची भर पडली. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील बाधितांची संख्या दोनशेहून अधिक आढळत होती. त्यातुलनेत मंगळवारी कमी बाधित आढळले. नवीन बाधितांमुळे येथील आजपर्यंतच्या बाधितांची संख्याही ४,४८७ वर पोहचली आहे.

शहरात ९.०५ टक्के चाचण्यांचे अहवाल सकारात्मक

जिल्ह्य़ात आजपर्यंत एकूण करोना संशयितांच्या तब्बल ६८ हजार ६९१ चाचण्या करण्यात आल्या. यापैकी शहरात झालेल्या ३५ हजार ५३९ चाचण्यांपैकी ९.०५ टक्के म्हणजे ३,२१९ चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आले.  ग्रामीणमध्ये झालेल्या ३३ हजार १५२ चाचण्यांपैकी ३.५३ टक्के म्हणजे १,१७३ अहवाल सकारात्मक आले.

एकाच दिवशी १०२ करोनामुक्त

उपराजधानीत एकाच दिवशी ग्रामीणचे ४८ तर शहरातील ५४ असे १०२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे  करोनामुक्तांची संख्या आता २,६८५ वर पोहचली आहे. यापैकी १,४१३ जण महापालिका हद्दीतील तर १,१७२ जण ग्रामीण भागातील आहेत.

आता थेट वस्त्यांमध्ये जोखमीच्या रुग्णांची  तपासणी 

करोना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी आता शहरातील विविध भागात महापालिकेच्यावतीने करोना तपासणी केली जात आहे. या माध्यमातून दोन हजारावर लोकांची तपासणी झाली असून हनुमाननगर झोनअंतर्गत १४८ लोकांची तपासणी मंगळवारी करण्यात आली. हनुमाननगर परिसरातील बाधितांच्या संपर्कात आलेल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत अशा उच्च जोखमीच्या नागरिकांसह कोणतीही लक्षणे नसलेली व बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी  करण्यात आली.यावेळी नगरसेवक रवींद्र (छोटू) भोयर, नगरसेविका उषा पॅलेट, शीतल कामडी, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. गोगुलवार, डॉ. शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू उपस्थित होते.

सर्वाधिक बाधित धंतोली, नेहरूनगर झोनमध्ये

मंगळवारी दुपापर्यंत सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महापालिकेच्या धंतोली (१७ रुग्ण) आणि नेहरूनगर (१२ रुग्ण) झोनमध्ये आढळले. आशीनगर झोनमध्ये १०, मंगळवारी झोनमध्ये १२, सतरंजीपुरा झोनमध्ये ८, गांधीबाग झोनमध्ये ६, लक्ष्मीनगर झोनमध्ये ५, धरमपेठ झोनमध्ये ५, हनुमाननगर झोनमध्ये ३, लकडगंज झोनमध्ये ४ बाधित आढळले. एकूण ८४ बाधितांमध्ये महिलांच्या (३४ रुग्ण) तुलनेत पुरुषांची संख्या (४८ रुग्ण) जास्त होती.

सक्रिय रुग्णांची संख्या सतराशे पार

उपराजधानीतील सक्रिय रुग्णांची संख्या मंगळवारी सतराशे पार गेली. यापैकी २९२ रुग्ण मेयोत, २७४  मेडिकलमध्ये, ४७  एम्समध्ये, ९  कामठीत, ३९ रुग्ण वोक्हार्ट रुग्णालयात उपचार घेत आहेत.  २६८ रुग्ण आमदार निवास, ३९ रुग्ण मध्यवर्ती कारागृह, २२८ रुग्ण व्हीएनआयटी, २३ रुग्ण वारेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. दुपारी ४,८७ जणांवर दाखल करण्याची प्रक्रिया  सुरू  होती.