२४ तासांत ६५ मृत्यू; २,२४३ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात करोनाचा प्रभाव ओसरत असून २४ तसांत ६५ रुग्णांचा मृत्यू तर २ हजार २४३ नवीन रुग्णांची भर पडली. नवीन रुग्णांच्या तुलनेत २४ तासांत तिपटीहून अधिक म्हणजे ६ हजार ७२५ व्यक्ती करोनामुक्त झाले.

२४ तासांत शहरात ३२, ग्रामीणला १९, जिल्ह्य़ाबाहेरील १४ अशा एकूण ६५ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ९८४, ग्रामीण २ हजार ८५, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार १८९ अशी एकूण जिल्ह्य़ात ८ हजार २५९ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात १ हजार ३६३, ग्रामीणला ८६६, जिल्ह्य़ाबाहेरील १४ असे एकूण जिल्ह्य़ात २ हजार २४३ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख २० हजार ६४३, ग्रामीण १ लाख ३१ हजार ८३४, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ३७१ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ५३ हजार ८४८ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात ४ हजार ३५, ग्रामीण २ हजार ६९० असे एकूण ६ हजार ७२५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ९२ हजार ४४९, ग्रामीण १ लाख ६ हजार ५४५ अशी एकूण जिल्ह्य़ात ३ लाख ९८ हजार ९९४ व्यक्तींवर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत  करोनामुक्तांचे प्रमाण ८७.९१ टक्के आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ४६,५९६ वर

शहरात २३ हजार ४६७, ग्रामीणला २३ हजार १२९ असे एकूण ४६ हजार ५९६ सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ७ हजार ९१ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालये वा कोविड केअर सेंटरमध्ये  तर ३७ हजार ५०५ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

विदर्भातील मृत्यूसंख्येत आणखी घट

विदर्भातील अकरा जिल्ह्य़ांमध्ये २४ तासांत १७४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर ८ हजार ४४३ नवीन रुग्णांची भर पडली. विदर्भात १० मे रोजी १९२ रुग्णांचा मृत्यू तर ७ हजार ५३० नवीन रुग्णांची भर पडली होती. प्रथमच विदर्भात अनेक आठवडय़ानंतर मृत्यूसंख्या २०० खाली नोंदवली गेली होती. त्यातच मंगळवारी पुन्हा मृत्यूसंख्या खाली घसरून १७४ वर आली. परंत सोमवारच्या ७ हजार ५३० च्या तुलनेत मंगळवारी ८ हजार ४४३ रुग्ण आढळले. मृत्यूंमध्ये नागपुरातील ३२, ग्रामीण १९, जिल्ह्य़ाबाहेरील १४, अशा एकूण  ६५ रुग्णांचा समावेश आहे. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ३७.३५ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत २ हजार २४३ नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात ८ रुग्णांचा मृत्यू तर २१७ रुग्ण, अमरावतीत १४ मृत्यू तर १ हजार १६ रुग्ण, चंद्रपूरला ९ मृत्यू तर ८९५ रुग्ण, गडचिरोलीत ११ मृत्यू तर ३७२ रुग्ण, गोंदियात ९ मृत्यू तर ५०० रुग्ण, यवतमाळला २५ मृत्यू तर ७७६ रुग्ण, वाशीमला १ मृत्यू तर ४६७ रुग्ण, अकोल्यात १० मृत्यू तर ६५४ रुग्ण, बुलढाण्यात ४ मृत्यू तर ६५४ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात १८ मृत्यू तर ६४९ नवीन रुग्ण आढळले.

पाचपावलीत ११० खाटांचे रुग्णालय सुरू

महापालिकेतर्फे पाचपावली सूतिकागृह परिसरात प्राणवायूची निर्मिती करण्यात आली असून येथील ११० खाटांचे करोना रुग्णालय मंगळवारी सुरू करण्यात आले. सर्व खाटांवर प्राणवायूची सुविधा करण्यात आली आहे. या रुग्णालयासाठी  द्रव्य प्राणवायू टँक सुद्धा लावण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे. द्रव्य प्राणवायू टँकची (लिक्विड ऑक्सिजन टँक) व्यवस्था करण्यात आलेले नागपूर मालिकेचे पहिले रुग्णालय ठरले आहे. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती संजय महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते. आसरा फाऊं डेशनच्या आसरा चॅरिटेबल मल्टी स्पेशिलिटी क्लिनिक, शांतीनगर संस्थेमार्फत या रुग्णालयाच्या संचालनात मदत होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अवेज हसन यांनी महापालिकेला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

चाचण्यांची संख्या घसरली

शहरात दिवसभरात ९ हजार ७६८, ग्रामीणला ४ हजार ६९६ अशा एकूण १४ हजार ४६४  चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल बुधवारी अपेक्षित आहे. परंतु सोमवारी तपासलेल्या १५ हजार ४६४ नमुन्यांमध्ये २ हजार २४३ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण १४.६५ टक्के नोंदवले गेले.

लसीकरण आढावा

पहिली मात्रा

आरोग्य सेवक       – ४४२५९

फ्रंट लाईन वर्कर      – ४९८४०

१८ अधिक वयोगट –  १०२७३

४५ अधिक  वयोगट   – १,०९,६०६

४५ अधिक कोमार्बिड     – ७८०३४

६० अधिक सर्व नागरिक – १,६४,५७३

एकूण  –     ४,५६,५८५

दुसरी मात्रा

आरोग्य सेवक           – २१४८६

फ्रंट लाईन वर्कर       –  १४७१५

४५ अधिक वयोगट      – १८८७५

४५ अधिक कोमार्बिड  –  १३१२३

६० अधिक सर्व नागरिक   – ५८०१०

एकूण –    १,२६,१९१

संपूर्ण लसीकरण एकूण -५,८२,७७६