१,९३४ नवीन बाधितांची भर; मृतांची संख्या पंधराशे पार

नागपूर : येथील शहरी व ग्रामीण भागात बुधवारी २४ तासांत ५९ करोना बळींचा उच्चांक नोंदवला गेला असतानाच गुरुवारी आणखी ५८ मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. तर दिवसभरात जिल्ह्य़ात नवीन १ हजार ९३४ बाधितांची भर पडली आहे. नवीन मृत्यूमुळे आजपर्यंतच्या करोना बळींची संख्या पंधराशे पार गेली आहे.

आजच्या ५८ पैकी सर्वाधिक ४३ मृत्यू शहरी भागातील, ९ मृत्यू ग्रामीण भागातील, ६ मृत्यू जिल्हाबाहेरील शहरात उपचार घेणाऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या बळींची संख्या थेट १ हजार ५१६ वर गेली आहे.

त्यातील १ हजार १६३ मृत्यू शहरातील, २१६ मृत्यू ग्रामीणचे, १३७ बळी जिल्हाबाहेरील येथे उपचार घेणाऱ्या बाधितांचे आहेत. दरम्यान, दिवसभरात आढळलेल्या १ हजार ९३४ नवीन बाधितांपैकी १ हजार ४५० बाधित शहरी भागातील, ४७८ बाधित ग्रामीणचे, ६ बाधित जिल्ह्य़ाबाहेरून येथे उपचाराला आलेले आहेत.

या रुग्णांमुळे येथे आजपर्यंत आढळलेल्या एकूण बाधितांची संख्या थेट ४६ हजार ४९० वर पोहचली आहे. त्यात शहरातील ३६ हजार ६६६, ग्रामीणचे ९ हजार ५०५, जिल्हाबाहेरील ३१९ जणांचा समावेश आहे.

शहरात सातत्याने नवीन बाधितांसेाबत मृत्यूचीही संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने येथील करोना व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दिवसभरात दीड हजारावर करोनामुक्त

येथील शहरी भागात दिवसभर्यात १ हजार ३४२, ग्रामीणला १७१ असे एकूण १ हजार ५१३ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंत येथे करोनामुक्त झालेल्यांची संख्या थेट ३३ हजार ७९ वर पोहचली आहे. पैकी शहरातील २२ हजार ६४९ तर ग्रामीणचे ६ हजार ४३० जणांचा समावेश आहे.

पुन्हा चाचण्यांची संख्या घटली

जिल्ह्य़ात बुधवारी २४ तासांतील करोना चाचण्यांची संख्या ८ हजार ३८० नोंदवण्यात आली होती. त्यात आरटी पीसीआरच्या ४ हजार १२४ चाचण्या तर रॅपिड अँटिजनच्या ४ हजार २५६ चाचण्यांचा समावेश होता. दुसऱ्याच दिवशी गुरुवारी ही संख्या पुन्हा कमी होऊन ६ हजार ७११ वर आली आहे. त्यात आरटी पीसीआरच्या ३ हजार ६७८ तर रॅपिड अँटिजनच्या ३ हजार ३३ चाचण्यांचा समावेश आहे.

सक्रिय रुग्णांचाही उच्चांक

येथील शहरी भागात ८ हजार २१० तर ग्रामीण भागात ३ हजार ६८५ असे एकूण ११ हजार ८९५ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू असून हा आजपर्यंतच्या सक्रिय बाधितांचा उच्चांक आहे. पैकी ६ हजार ७२८ बाधितांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहे, तर ३ हजार २३३ जणांवर विविध कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. पैकी अनेकांना प्राणवायू (ऑक्सिजन)ची गरज आहे. तर गुरुवारी दुपापर्यंत १ हजार ९३४ जणांवर उपचाराची प्रक्रिया सुरू होती.