• वाहन विक्रीची कागदपत्रे विलंबाने सादर
  • कारणे दाखवा नोटीस बजावली

नवीन वाहन क्रमांक न घेताच त्याची ग्राहकांना विक्री करणाऱ्या चार वाहन विक्रेत्यांना परिवहन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत उत्तर आल्यावर सुनावणी घेऊन विक्री प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कालावधी निश्चित होईल. यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विक्रेत्यांनी वाहन विक्रीची कागदपत्रे आरटीओमध्ये विलंबाने सादर केली होती. ही बाब आरटीओ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्याचे तीन दिवसात उत्तर मागवण्यात आले आहे. ते प्राप्त झाल्यावर सुनावणी होऊन परवाना रद्दचा कालावधी निश्चित होईल. उत्तर न आल्यास एकतर्फी निर्णय घेण्याचे अधिकार आरटीओला आहे, हे विशेष.

नागपूर शहरातील ७० टक्के भाग पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तर ३० टक्के भाग हा शहर कार्यालयाच्या अखत्यारित येतो. शहरातील सर्व वाहन विक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी या कार्यालयांचीच आहे. प्रमाणपत्र देण्यापूर्वी आरटीओचे संबंधित अधिकारी विक्रेत्यांच्या शोरुमचे निरीक्षण करून तेथे ग्राहकांकरिता पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छता गृह व इतर ग्राहकांकरिता आवश्यक सुविधांची पाहणी करतात. ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खात्री पटल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतरच विक्रेत्याला वाहन विक्री करता येते. नियमाप्रमाणे नवीन वाहन खरेदी केल्यावर ग्राहकाला आरटीओकडे वाहनाच्या करापोटीचे सगळे शुल्क ऑनलाईन भराणे गरजेचे आहे. त्यानंतर ही कागदपत्रे विक्रेत्याने आरटीओत जमा केल्यावर आरटीओ निरीक्षकाकडून वाहनाची पाहणी होते. त्यानंतर वाहन क्रमांक मिळतो हे येथे उल्लेखनीय.

नोटीस बजावलेले विक्रेते

  • ऑटोमोटिव्ह मॅन्यूफॅक्चर,अमरावती रोड, नागपूर
  • नांगिया ऑटोमोटिव्ह, यशवंत स्टेडियम
  • ताजश्री ऑटोमोटिव्ह, देवनगर
  • पॅरागोन ट्रेडर्स, हॉटेल हरदेव जवळ

ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या वाहन विक्रेत्यांच्या विरोधात परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते. त्यानुसार आरटीओत विलंबाने कागदपत्र सादर करून ग्राहकांना त्रास देणाऱ्या शहरातील ४ वाहन विक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्र रद्दची नोटीस बजावली आहे. त्याचे उत्तर आल्यावर प्रशासनाकडून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.’’

शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur rto vehicle sellers
First published on: 08-09-2017 at 00:53 IST