• पूर्व नागपूरच्या सव्वातीनशेवर बस गाडय़ांना अंतिम नोटीस
  • दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर

शाळा सुरू होऊन अनेक महिने लोटल्यावरही नागपूरसह राज्यभरात ४० टक्क्याहून जास्त स्कूलबस चालकांनी फिटनेस तपासणीच केली नाही. स्कूलबस चालकांकडून प्रतिसाद नसल्याचे बघत विलंबानेच का होईना प्रादेशिक परिवहन विभाग, नागपूर शहरने उपराजधानीतील २९६ बसेसचे परवाने चार महिन्याकरिता निलंबित केले आहे. पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानेही सव्वातीनशेवर बसेसला परवाना निलंबनाची अंतिम नोटीस दिली आहे. या कारवाईने दिवाळीनंतर शाळेच्या सुटय़ा संपताच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे.

नागपूर शहरात १,९१८ तर राज्यात २५ हजारांच्या जवळपास ‘स्कूलबस, स्कूलव्हॅन्स’मध्ये लाखो शालेय विद्यार्थ्यांची ने-आण होते. या वाहनांचे वाढते अपघात बघता काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने कडक कायदे केले. अंमलबजावणीसाठी स्कूलबस, स्कूलव्हॅन, ऑटोरिक्षांमध्ये आवश्यक बाबींची एक मार्गदर्शक सूचना जारी झाली. त्यानुसार स्कूलबसमध्ये अग्निशमन यंत्रणा, त्यांचा रंग, त्यात काही अनुचित घडल्यास त्वरित बाहेर पडण्याकरिता आवश्यक असलेली आपत्कालीन खिडकी, विद्यार्थ्यांना पकडण्याकरिता विशिष्ट प्रकारचा दांडा, विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी एक वाहक, वाहनात विद्यार्थिनी असल्यास महिला वाहकांसह इतरही अनेक बदलांचा समावेश होता.

या दुरुस्तीकडे बहुतांश चालकांनी दुर्लक्ष केले. या विषयावर मुंबई उच्च न्यायालयालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल झाली. न्यायालयाने राज्याच्या परिवहन विभागाला १ मे ते ५ जून २०१६ दरम्यान स्कूलबस, व्हॅनची फिटनेस तपासणीचे आदेश दिले, परंतु अद्यापही ४० टक्क्यांहून जास्त बसेसची तपासणीच झाली नाही. राज्याच्या परिवहन आयुक्तांसह सगळ्याच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्कूलबस चालकांना विविध नोटीस पाठवत वेळोवेळी फिटनेस तपासणीचे आव्हानही केले, परंतु ४० टक्के चालकांकडून प्रतिसादच नाही. शेवटी नागपूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता कडक कारवाई सुरू केली आहे.

school-bus-chart

कारवाई अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहरातील २९६ स्कूलबसचे परवाने तब्बल ४ महिन्यांसाठी निलंबित केले असून हे आदेश लवकरच स्कूलबस चालकांना मिळणार आहे, तर पूर्व नागपुरातील सव्वातीनशेवर बसचालकांनाही निलंबनाची अंतिम नोटीस दिली आहे. या कारवाईने शहरातील स्कूलबस चालकांचे धाबे दणाणले आहे. पूर्व नागपूरच्या बसचालकांनी त्वरित फिटनेस न केल्यास त्यांचेही परवाने निलंबित होणार आहे. सध्या नागपुरातील शाळांना दिवाळीच्या सुटय़ा असल्याने काही दिवस या आदेशाचा परिणाम होणार नसला तरी सुटय़ा संपताच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता स्कूलबसची फिटनेस तपासणी गरजेची आहे. वारंवार आवाहन करूनही स्कूलबस चालक प्रतिसाद देत नसल्याने प्रादेशिक परिवहन विभागाला नाईलाजाने कायद्यानुसार स्कूलबसचे परवाने निलंबित करावे लागत आहे. इतर स्कूलबस चालकांनी त्वरित फिटनेस करावे.

शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त कारभार), नागपूर शहर