* दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीची मृत्यूशी झुंज
* नागपूर जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
नागपूर जिल्ह्य़ात गुंडांच्या छेडछाडीमुळे कामठीतील एका शाळकरी मुलीने आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत अतिप्रसंगाला विरोध करताना रामटेक तालुक्यातील कांद्री येथील १४ वर्षीय मुलीच्या हाताची दोन बोटे कापली गेली. मेयो रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे.नागपूर जिल्ह्य़ातील या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवरच गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
कामठीत रोजच्या छेडछाडीने त्रस्त झालेल्या एका शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती आहे. दहावीच्या अभ्यासाची तयारी या मुलीने हिने २० मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली. सुरुवातीला तिच्या आत्महत्येचे कारण कळले नाही. मात्र, जेव्हा तिच्यासोबत शाळेत जाणाऱ्या तिच्या बहिणीने संबंधित मुलीसोबत गेल्या काही दिवसात घडलेली हकीकत सांगितली, तेव्हा हा प्रकार पुढे आला.
सुरेश खंडाते आणि राहुल थूल, अशी आरोपींचे नावे असून ते काही दिवसांपासून सतत त्या मुलीचा पाठलाग करून शेरेबाजी करायचे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून कामठी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात छेडछाडीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलीची बोटे तुटली
अंगावर शहारे आणणारी दुसरी घटना रामटेक तालुक्यातील कांद्री येथे घडली. ४५ वर्षीय महेश रौतेलने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या मुलीने विरोध केल्यावर संतापलेल्या महेशने सत्तूरने तिच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर वार केले. त्यात मुलीच्या उजव्या हाताची दोन बोटे कापली. दरम्यान,पुर्वी एका प्रकरणात जन्मठेप भोगलेल्या महेशला पोलिसांनी अटक केली.

गुंडगिरी ठेचल्याचा दावा फोल
नागपूर जिल्ह्य़ातील कामठी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांनी जिल्ह्य़ात कायद्याचे राज्य असून गुंडगिरी ठेचल्याचा दावा केला होता. जिल्ह्य़ातील दोन्ही घटनांवरून गुंड किती निर्ढावले, याची प्रचिती आणि महिला व शाळकरी मुली किती असुरक्षित आहेत, हे दिसून येते.