देशात तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत असून यासह इतर कारणांमुळे सर्वत्र कर्करुग्णांचीही संख्या वाढत आहे. विविध संस्थेने केलेल्या अहवालात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कर्करुग्णांचे प्रमाण वाढले असून मुखासह स्तनाच्या कर्करोगात नागपूर हा देशात दुसऱ्या क्रमांकावर आल्याचे पुढे येत आहे, अशी माहिती शनिवारी डॉ. सुशील मंधानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सव्‍‌र्हेक्षणातील महाराष्ट्रात सर्वाधिक कर्करोगाचे प्रमाण नागपुरात आढळले आहे. स्तन कर्करुग्णांमध्ये प्रत्येक १ लाखांमागे ३२.१ रुग्णांना हा आजार असल्याचे पुढे आले असून प्रत्येक लाखामागे १३ रुग्णांना मुखाचा कर्करोग आहे.

विदर्भातील वर्धा येथे सुरू झालेल्या कर्करोग नोंदणीमध्ये प्रत्येक शंभर नोंदणीतील ५२ महिला व ४८ टक्के पुरुषांमध्ये हा आजार आहे. नागपुरात २००५ ते २००९ दरम्यान ९ हजार ४४७ कर्करुग्णांची नोंदणी झाली असून सरासरी काढल्यास १ हजार ८८९ नवीन रुग्णांची त्यात भर पडते. अभ्यासात नागपूरसह विदर्भात आढळणाऱ्या प्रत्येक १०० कर्करुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णांना मुखाचा कर्करोग असल्याचे आढळले.  तंबाखूपासून बनणाऱ्या खऱ्र्याची सर्वाधिक विक्री शहरात होत असल्याने व त्याचे सेवन हजारो लोक करीत असल्याने हा प्रकार घडत असल्याची माहिती डॉ. मंधानिया यांनी दिली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात प्रत्येक वर्षी १० लाखाहून जास्त नवीन कर्करुग्णांची भर पडते.त्यात ४ लाख ७७ हजाराहून जास्त पुरूष तर ५ लाख ३७ हजाराहून जास्त महिलांचा समावेश आहे. महिलांमध्ये गर्भाशय व स्तनाचा कर्करोग जास्त आढळत असल्याने रुग्णांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. कर्करोगावर वेळीच उपाय केल्या गेले नाही तर सन २०३० पर्यंत मृत्यूंची संख्या दुप्पट होण्याचा धोका जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.