नागपूर विभागाचा निकाल ८५.३४ टक्के
आज जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात प्रविष्ट मुलींची संख्या मुलग्यांपेक्षा कमी असली तरी मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलग्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, त्याचबरोबर त्या त्या शाळेतून मुलगेच अव्वल असल्याचे दिसून येते. एकूणच मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त असली तरी जास्तीत जास्त गुण मिळविण्याच्या शर्यतीत मुलग्यांच्या तुलनेत त्या मागे आहेत.
उदाहरणच द्यायचे झाले तर, ग्रेट नागरोडवरील तेजस्विनी विद्यालय, मेडिकल चौकातील पंडित बच्छराज व्यास, श्रीकृष्णनगरातील विश्वास माध्यमिक स्कुलचे अनुक्रमे चैतन्य येवले, अभिनव चंद्रशेखर शिखरे, सुमंत सुभाष वरोकर या विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण लक्षवेधक ठरले आहेत. नागपूर विभागात नोंदणीकृत मुलगे ९१,२४४, तर मुली ८७.९९१ होत्या.
त्यापैकी ९०,७२५ मुलगे आणि ८७,७४४ मुली परीक्षेला प्रविष्ट झाले. यापैकी ७५,३३२ मुलगे आणि ७६,९८२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलग्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८३, तर मुलींची ८७.७३ आहे. नऊ विभागीय मंडळांसह संपूर्ण राज्यात माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र मार्च २०१६ च्या परीक्षेचा नागपूर विभागाचा निकाल ८५.३४ टक्के आहे. एकूण १,७९,२३५ नियमित विद्यार्थ्यांची नोंद झालेली असून १,७८,४६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी १,५२,३१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात एकूण परीक्षा केंद्र ६६७ होते. नागपूर जिल्ह्य़ात ६५,७६४ विद्यार्थी प्रविष्ट होते. भंडाऱ्यात २०,३२१, चंद्रपुरात २७,५२३, वध्र्यात १९,२३५, गडचिरोलीत १६,५५१ आणि गोंदिया जिल्ह्य़ात २३,५६३ विद्यार्थी प्रविष्ट होते.
या सहाही जिल्ह्य़ांपैकी गोंदिया जिल्ह्य़ाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक ८८.२३ टक्के, तर सर्वात कमी ८२.३ टक्के निकाल गडचिरोलीचा जाहीर झाला आहे. भंडाऱ्याचा ८४, चंद्रपूरचा ८३.३१, गडचिरोलीचा ८७.९७ टक्के निकाल आहे. गेल्या वर्षीच्या निकालात नियमित विद्यार्थ्यांची टक्केवारी ८७ टक्के होती. नियमित विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीत गेल्या वर्षांपेक्षा १.६७ टक्के एवढी घट यावर्षी जाणवते.

सामान्य गणिताचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७२ टक्के आहे. सर्वच्या सर्व १०० टक्के बंगाली, तामिळ आणि हिंदी-पाली या तीन भाषांचा लागलेला आहे. त्यात बंगालीमध्ये ३१ विद्यार्थी, तामिळमध्ये १ आणि हिंदी-पालीमध्ये पाच विद्यार्थी होते आणि हे सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्याने तिन्ही विषयांचा निकाल १०० टक्के आहे. त्यानंतर इलिमेंटस् ऑफ मेकॅनिकल अभियांत्रिकीचा निकाल ९९.९५ टक्के आहे. त्यानंतर इलिमेंटस् ऑफ इलेक्ट्रिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा निकाल (९९.७४), संस्कृतचा (९९.१३), हिंदी-तामिळचा (९९) आहे, तर मराठीचा निकाल ८९.१९ टक्के असून एकूण १४,७,७८२ विद्यार्थी मराठीला प्रविष्ट होते. त्यापैकी १,३१,८१३ विद्यार्थी उत्तीर्ण आले. इंग्रजीचा निकाल ९८.३० आहे. मात्र, मराठीच्या तुलनेत इंग्रजीचे विद्यार्थी फारच कमी आहेत. इंग्रजीला १६,७०९ विद्यार्थी प्रविष्ट होते. पैकी १६,४२६ उत्तीर्ण झाले.

ज्या गोंदिया जिल्ह्य़ाचा सर्वात जास्त ८८.२३ टक्के निकाल लागला आहे त्याच गोंदिया जिल्ह्य़ात सर्वात जास्त कॉपी प्रकरणे सापडली. गोंदियात ६३ कॉपी प्रकरणांपैकी ६२ प्रकरणात विद्यार्थी दोषी आढळले, तर एक विद्यार्थी निर्दोष होता. त्या खालोखाल वर्धा जिल्हा असून १८ कॉपींपैकी १५ कॉपींमध्ये मुले दोषी तर तिघे निर्दोष आहेत. नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ात प्रत्येकी नऊ कॉपी असून सर्वच दोषी आहेत. भंडाऱ्यात पाच कॉपी प्रकरणे असून त्यापैकी चार दोषी आणि एक निर्दोष आहे, तर चंद्रपुरात कॉपी करणारे पाच विद्यार्थी असून सर्वच दोषी आढळले आहेत. विभागात एकूण १०९ कॉपी प्रकरणांपैकी १०४ प्रकरणांत दोषी विद्यार्थी आढळले असून पाच विद्यार्थी निर्दोष आहेत.

राज्यात ३९ मुलांना ५०० पैकी ५०० गुण
राज्यात ३९ मुलांना ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत. ही सर्व मुले खेळाडू असून खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी २१ एप्रिल २०१५च्या शासन निर्णयानुसार त्यांना जास्तीत जास्त २५ गुण दिले जातात. आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग, प्रथम, द्वितीय किंवा तृतीय खेळाडू यांना २५ गुण, राष्ट्रीय खेळात प्रथम, द्वितीय किंवा तृतीय खेळाडू यांनाही २५ गुण, राज्यस्तरीय खेळात प्रथम, द्वितीय किंवा तृतीय गुण याला १५ गुण गेल्या वर्षीपासून दिले जातात, असे नागपूर विभागाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी सांगितले.

फळविक्रेत्याच्या मुलाचे घवघवीत यश
आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे या उदात्त हेतूने अभ्यासातील सातत्य कायम राखून फळविक्रेत्याच्या मुलाने घवघवीत यश संपादित करून इतर मुलांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. पंडित बच्छराज व्यासचा विद्यार्थी असलेल्या अभिनव चंद्रशेखर शिखरे या विद्यार्थ्यांने दहावीत ९८.४ टक्के गुण प्राप्त केले आहेत. खाऊन पिऊन सुखी असलेले हे कुटुंब मानेवाडा मार्गावरील दहावीच्या परीक्षेत प्रसिद्धीच्या झोतात आले ते अभिनवच्या यशामुळे. अभिनवचे वडील फळविक्रीचा व्यवसाय करतात आणि त्याची आई दीपाली या गृहिणी आहेत. बहीण मयुरी डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शिकत आहे. सतत अभ्यासात गढून असलेला अभिनव कंटाळा आला की शेजारी टीव्ही पहायला पाच-दहा मिनिटे जायचा आणि केवळ कार्टुन नेटवर्क पाहून पुन्हा अभ्यासावर रूजू व्हायचा. आईवडील, शाळेतील शिक्षकांचे प्रोत्साहनाबरोबरच खासगी शिकवणी वर्गाचा लाभही झाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे अभिनव हा लहानपणापासूनच हुशार असून उत्तरोत्तर तो चांगलेच गुण मिळवत गेल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. मला अभियंता व्हायचे आहे आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे अभिनव म्हणाला. त्याचा आवडता विषय गणित आणि विज्ञान आहे. गणितात त्याला ९९ तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात १०० गुण आहेत. गणितात पैकीच्या पैकी गुणांची त्याला अपेक्षा होती. मात्र, एक गुण कमी पडल्याची खंत त्याने व्यक्त केली. त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापक अर्चना जोशी आणि शिक्षक अस्मिता वैद्य यांनी त्याचे अभीष्टचिंतन केले.