भारतात पहिल्यांदाच स्पध्रेचे आयोजन

रिमोटच्या सहाय्याने उडणाऱ्या विमानांच्या करामतीत नागपुरातील शाळकरी मुलांनी ठसा उमटवला आहे, पण आता मोकळ्या आकाशात नव्हे तर बंदद्वार क्रीडा संकुलात (इनडोअर स्टेडियम) रिमोटशिवाय विमान उडवण्याच्या करामती याच मुलांनी साध्य केल्या. एरो मॉडेलर असोसिएशन दिल्लीच्या वतीने भारतात पहिल्यांदाच सोनीपथ हरियाणा येथे अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. संपूर्ण भारतातून सुमारे २५० मुले यात सहभागी झाली होती. या स्पध्रेत नागपुरातील इयत्ता सातवीतल्या एअरोविजनच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून पुन्हा एकदा एरोमॉडेलिंग क्षेत्रात नागपूरचा ठसा उमटवला.

लाकडाचाच एक प्रकार असलेल्या बाल्सावूडपासून अवघ्या बारा इंचीचे विमान (रबर पॉवर्ड कार) तयार करून ते उडवण्याची स्पर्धा क्रीडा संकुलात घेण्यात आली. यात नागपूरच्या स्पर्श रन्नवरे, महेश्वर ढोणे, निशांत गेडाम, निहार रडके आणि अभिग्यान पटेल या पाच विद्यार्थ्यांच्या चमूने प्रथम पारितोषिक पटकावले. तब्बल ११ सेकंदपर्यंत विमानाचे यशस्वी उड्डाण त्यांनी केले.

‘वॉक अलार्म ग्लायडर’ हा प्रकार खरे तर अतिशय कठीण आहे. यात त्रिकोणी आकाराचे थर्माकोलचे अवघ्या .०९० मिलिग्रामचे आणि विना इंजिनचे विमान नुसत्या हवेच्या दाबावर तरंगत ठेवणे अतिशय कठीणच नव्हे तर संयमाचीसुद्धा परीक्षा असते. एक हात उंच करून ते हलके विमान सोडायचे आणि लगेच थर्माकोलचा तुकडा त्या विमानाच्या खाली पकडून त्याला हवा देत तरंगत ठेवायचे, असा हा प्रकार आहे. भारतातला हा सर्वात पहिला प्रयोग महेश्वर ढोणे या नागपूरकर विद्यार्थ्यांने केला. त्याने तब्बल ३३ मिनिटे हे विमान हवेत तरंगत ठेवले. नासाने रचना केलेल्या विमानांच्या ‘फोम प्लेट ग्लायडर’ प्रतिकृती तयार करण्याचे प्रशिक्षण या मुलांना देण्यात आले. थर्माकोलच्या कागदासारख्या स्लाईस तयार करून त्यापासून विमानांचे पंख तयार करण्यात आले. या प्रशिक्षणानंतर आयोजित स्पध्रेत स्पर्ध रन्नवरेने द्वितीय क्रमांक पटकावला.

स्पध्रेचा उद्देश मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि हवाई क्षेत्र आणखी विस्तारावे हा होता. यावेळी कॅप्टन ओंकारदत्त शर्मा व सर्व एरोमॉडेलर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

एरोमॉडेलिंगची विमाने जशी बाल्सावूड या लाकडापासून तयार होतात, तशीच ती फोमप्लेटपासूनसुद्धा बनू शकतात. अशाच प्लेटपासून अमेरिकेतील नासा या संस्थेने विमान तयार केले. अतिशय कमी खर्चात तयार होणारी विमाने तयार होण्यासह विमान का उडते, कसे उडते, त्याचा समतोल कसा साधला जातो ही मूलभूत तत्त्व या क्षेत्रात येणाऱ्यांना कळावे हा यामागील उद्देश होता.