दिल्लीला गणराज्य दिनी मुख्य कार्यक्रमात राजपथावर पथसंचलनात सादर होत असलेल्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर केंद्राने सहा वेळा पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या उपराजधानीने दबदबा निर्माण केल्यानंतर यावर्षी केंद्राच्या माध्यमातून राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नागपूरच्या विविध शाळांतील विद्यार्थी राजपथावर मध्यप्रदेशातील सईला हे पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करणार आहेत. शहरातील २२ शाळांतील १६७ विद्यार्थ्यांचा यात समावेश असून त्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि खासगी शाळेमधील विद्यार्थी आहेत.

पारंपरिक लोककला आणि नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने देशपातळीवर दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यात स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन दिले जाते. दिल्लीमध्ये गणराज्यदिनी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पथसंचलनात देशभरातील आकर्षक चित्ररथाचा समावेश असताना त्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश असतो आणि हा मान नागपूरला मिळत असल्यामुळे दरवर्षी शहरातील विविध शाळांतील मुले पथसंचलनात सहभागी होत असतात. गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या सोंगी मुखवटे या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला असताना त्यावेळी विविध शाळांतील १५० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते आणि सहाव्यांदा उपराजधानीला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. यावर्षी केंद्राच्या वतीने मध्यप्रदेशातील सईला हे पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले जाणार आहे. या नृत्याची गेल्या महिन्याभरापासून केंद्राच्या परिसरात तालीम सुरू असताना दररोज पाच ते सहा तास विद्यार्थ्यांनी त्यासाठी मेहनत घेतली आहे. ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर अरविंद राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यात आला असून ५ जानेवारीपासून दिल्लीला सराव केला जाणार आहे. शहरातील २२ शाळेतील १६७ विद्यार्थी यात सहभागी झाले असून त्यात प्रत्येक शाळेतील आठ ते दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थी सोमवारी दिल्लीला रवाना झाले असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रेल्वेस्थानकावर पालक, शिक्षकांनी गर्दी केली होती.

महापालिका शाळेतील विद्यार्थी या नृत्यात दरवर्षी सहभागी होत असताना यावेळी १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शेषराव वानखेडे शाळेतील सात, तर वाल्मीकी शाळेचे तीन असे १० विद्यार्थी असून त्यात मुलींचा समावेश आहे. महापौर प्रवीण दटके आणि शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने दरवर्षी गणराज्यदिनाला पथसंचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व असताना त्यात केंद्राच्या वतीने सईला हे मध्यप्रदेशातील पारंपरिक आदिवासी लोकनृत्य सादर केले जाणार आहे. दोन महिन्यापूर्वी केंद्राच्या सांस्कृतिक विभागाची चमू नागपुरात आली असताना त्यांनी या लोकनृत्याची निवड केली आणि त्यानंतर जवळ ३० दिवसांपासून केंद्राच्या परिसरात शहरातील सर्व शाळेतील मुले एकत्र येऊन त्याची तालीम करीत आहेत. गेल्यावर्षी प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असून त्यांनी मेहनत केली आहे. केंद्राच्या वतीने या विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. २२ शाळेतील १७६ विद्यार्थी असून त्यांच्यासोबत शाळेतील शिक्षक जाणार आहेत.

– डॉ. पीयूषकुमार, संचालक, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र