गेल्या वर्षीच्या थंडीने उपराजधानीचा गेल्या आठ दशकांचा विक्रम मोडीत काढत ३.५ अंश सेल्सिअस इतकी किमान तापमानाची नोंद केली होती. या वर्षी हा विक्रमही मोडणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

डिसेंबरअखेर नागपूरसह चंद्रपूर आणि गोंदिया शहरातही किमान तापमान पाच अंश सेल्सिअसजवळ पोहोचले आहे. संपूर्ण विदर्भात गेल्या दोन दिवसांत गारठा वाढल्याचे चित्र आहे.

यंदा पावसाचा पूर्ण ऋतू उलटून गेला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस आला नव्हता, मात्र उशिरा आल्यावर तो धो-धो बरसला. थंडीबाबतही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. साधारण ऑक्टोबरच्या अखेरीस थंडीला सुरुवात होते. या वर्षी डिसेंबरअखेर थंडीला सुरुवात झाली. अवघ्या आठवडय़ाभरातच नागपूरसह विदर्भातील काही शहरांचे वातावरण बदलले. तीन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मधले तीन दिवस शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली होती.

वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे गेल्या दोन दिवसांत संपूर्ण विदर्भ गारठला आहे. आणखी दोन दिवस ही स्थिती कायम राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. शनिवारी अमरावतीत ९.२ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली.

तापमान घसरणीचा वेग..

शुक्रवारपासून किमान तापमानात प्रचंड वेगाने घट झाली आहे. शुक्रवारी पहाटे १०.६ अंश सेल्सिअसवर असणारे किमान तापमान शनिवारी पहाटे ५.१ अंश सेल्सिअसवर आले. यापूर्वी २०१६ साली ३१ जानेवारीला शहरात ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. नागपूरसह गोंदिया येथे ५.२ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर येथे ५.४ अंश सेल्सिअस इतकी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

इतर भागांत..

मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानातही काहीशी घट झाली आहे. महाबळेश्वर, नाशिक, जळगाव आदी ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास आले आहे. कोकण विभागातील मुंबई, रत्नागिरी, अलिबाग या ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशांनी अधिक आहे. मराठवाडय़ातील तापमानातही घट झाली असून, परभणीमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कमी झाले असून, तेथे थंडी वाढली आहे. औरंगाबादमध्ये सरासरीच्या आसपास तापमान आहे. कोकण विभाग वगळता मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील दिवसाच्या कमाल तापमानातही मोठी घट झाली असून, सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा कमी तापमान नोंदविले जात असल्याने दिवसा हवेत गारवा जाणवतो आहे.

दिल्लीत नीचांकी २.४ अंश तपमान

नवी दिल्ली : दिल्लीत शनिवारी सकाळी २.४ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले असून या मोसमातील आतापर्यंतचे ते नीचांकी तापमान आहे. दाट धुक्याने दृश्यमानता कमी झाली असून त्यामुळे हवाई वाहतूक व इतर वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.