विदर्भात मे महिन्यात तापमान वाढ असताना यावर्षी मात्र एप्रिलच्या मध्यान्हातच तापमानाने उसळी घेतली. विदर्भातील सर्वाधिक ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपूर शहरात करण्यात आली. मागील वर्षी एप्रिल महिन्यातसुद्धा एवढे तापमान नोंदवले गेले नव्हते. त्यामुळे यावर्षी पारा ४८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खाते तसेच अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

राजस्थान तसेच गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्याचा परिणाम विदर्भातही जाणवू लागला असून ज्या भागात वारे अधिक त्या भागात तापमानही अधिक नोंदवले जात आहे. शुक्रवारी वर्धा शहरात ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते तर शनिवारी चंद्रपूरमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. नागपूरमध्ये ४४.५ अंश.से. तापमान होते.

चंद्रपूर शहरात यंदा तापमान ४८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मे २०१३ मध्ये चंद्रपूर शहरात ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. तर त्याचवेळी नागपुरातही या मोसमातले सर्वाधिक तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चंद्रपूर शहरात तसेही दोन-तीन वर्षांआड तापमान ४७, ४८ अंश सेल्सिअसपर्यंत जात असते. मात्र, यावेळी संपूर्ण विदर्भातच उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणार आहे. दरम्यान, उष्णतेच्या लाटेने विदर्भात उसळी घेतल्याने लोकांनीही त्याचा धसका घेतला आहे. कडक उन्हामुळे रस्त्यांवरच वर्दळ कमी झाली असून रस्ते ओस पडू लागले आहेत. शासकीय व निमशासकीय कार्यालयात जाण्याच्या वेळेतच सुर्य डोक्यावर आलेला असतो आणि या उन्हाच्या झळा सोसतच नोकरदारांना घराबाहेर पडावे लागते.

काही वर्षांपूर्वी गुजरातमधील अहमदाबादेत उष्णतेच्या लाटेमुळे ३०० लोकांचा बळी गेला होता. दरम्यान, गुजरातच्या धर्तीवर यावर्षी ‘उष्माघात कृती आराखडा’ तयार करण्यात आला आहे.  गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर त्याची सुरुवात झाली आणि राज्यभर हा आराखडा लागू केला जाणार आहे. नागपूरात प्रायोगिक तत्त्वावर मागील वर्षी हा आराखडा राबवण्याचा प्रयत्न झाला, पण अंमलबजावणीत अपयश आले होते. यावर्षी उन्हाची तीव्रता पाहता गांभीर्याने आराखडय़ाची अंमलबजावणी होणार का, हे सध्यातरी प्रश्नांकित आहे.

‘उष्माघात कृती आराखडा’

– महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या उद्याने नागरिकांसाठी खुली करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी वातावरण थंड राहील अशी व्यवस्था असणार आहे.

– शहरातल्या वेगवेगळ्या भागात ‘शीत क्षेत्र’, बसस्थानक, प्रमुख चौक आदी ठिकाणी शेड, सामाजिक संस्थांतर्फे पानपोईची व्यवस्था  करणे

– शहरात ठिकठिकाणी रस्ते, इमारत बांधकाम सुरू आहेत. प्रामुख्याने दुपारी १२ ते ३ या दरम्यान बांधकाम बंद ठेवण्यात येणार आहे.

– विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्या वेळी घेण्याचे निर्देश महानगरपालिकेने शिक्षण संस्थांना दिले आहेत.

– तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास नागरिकांना एसएमएस व इतर माध्यमातून कळवले जाणार आहे.