अकोला ४७.४ अंशावर

नागपूर : नवतपाच्या पहिल्याच दिवशी अकोला शहराने ४७.४ अंश सेल्सिअस व त्यापाठोपाठ नागपूरने ४७ अंश सेल्सिअससह विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद के ली. सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत अकोला देशात दुसरे व जगात तिसरे आणि नागपूर देशात पाचवे तर जगात अकरावे शहर ठरले आहे. ३० मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन हवामान खात्याने के ले आहे.

गेल्या काही वर्षांत ऋतुचक्र  पूर्णपणे पालटले आहे. यावर्षीही वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन वर्षभरच सुरू आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होऊनही तापमानात वाढ होत नव्हती. मात्र, मागील दोन आठवडय़ापासून सूर्यनारायण चांगलाच कोपला आहे. विदर्भातील नागपूरसह अकोला, चंद्रपूर, अमरावती या शहरातील तापमान झपाटय़ाने वाढत आहे. कमाल तापमानच नाही तर किमान तापमानात देखील वाढ होत असून किमान तापमान ३० अंश सेल्सिअसजवळ पोहोचले आहे. अकोला आणि नागपूर या शहराने ४७ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे, तर ४६.८ आणि ४६ अंश सेल्सिअससह चंद्रपूर व अमरावती, वर्धा ही शहरे त्या उंबरठय़ावर आहे.

विदर्भातच नाही तर राज्यातील, भारतातील आणि जगातील उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये अकोला आणि नागपूरची नोंद होऊ लागली आहे. विकासाच्या गर्तेत सर्वच शहरांमध्ये हिरवे जंगल कमी होऊन सिमेंटच्या जंगलात वाढ होत आहे. त्यामुळे तापमानवाढीसाठी हा घटक देखील तेवढाच कारणीभूत ठरत आहे. एरवी उन्हाळ्यात दिवसा रस्त्यावर वर्दळ कमी असते. मात्र, टाळेबंदीमुळे दीड महिन्याहून अधिक काळ नागरिक घरातच बंदिस्त होते. आता हळूहळू शहरातील व्यवहार सुरू होऊ लागल्याने उन्हाची तमा न बाळगता नागरिक रस्त्यावर दिसून येत आहेत. पण वाढलेल्या तापमानामुळे पुन्हा घरातच राहावे लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या ३० मे पर्यंत उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत.

कृती आराखडा नाही

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच महापालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर उष्माघात कृ ती आराखडा तयार के ला जातो. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच करोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे सारे लक्ष त्यावर केंद्रित झाले. त्याचवेळी वादळी वाऱ्यासह अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने हा कृ ती आराखडा तयार करण्याकडे कु णाचेही लक्ष गेले नाही. मात्र, उष्णतेची ही लाट वाढतच असल्याने उष्णतेपासून बचाव कसा करायचा, हा प्रश्न सर्वापुढेच आहे.