नागपूरकरांना ऋतूबदलाचा अनुभव; उन्हामुळे दुपारचे चटके
हिवाळ्याचा दिवसाचा सुखद गारवा जवळपास परतला असताना उन्हाळयाची जाणीव उन्हाच्या दुपारी बसू लागलेल्या चटक्यांनी करून देण्यास सुरुवात केली आहे. चढत चाललेला उन्हाचा पारा आणि कोरडी हवा यामुळे नागपूरकरांना दिवसभर चटके सहन करावे लागत आहेत. सोमवारी तापमान ३४ अंशांवर गेले असतानाच फेब्रुवारीच्या अखेरीस त्यात आणखी एक-दोन अंशाने वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्याचे तापमान साधारणपणे जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धासारखेच असते. या कालावधीत उत्तरेकडून हलके वारे वाहू लागतात. थंडी परतीच्या मार्गावर असल्याने गेल्या काही दिवसांपासून दिवसा उन्हाचे चटके आणि सायंकाळी ते रात्रीच्या दरम्यान हलकासा गारवा जाणवतो. मात्र, ऋतुबदलाचा हा काळ असल्याने मध्येच उकाडासुद्धा जाणवू लागला आहे. फेब्रुवारी महिन्यात साधारणपणे सरासरी तापमान ३१ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते.
कमाल तापमान सध्या सरासरीत असले तरीही फेब्रुवारीच्या अखेपर्यंत कमाल आणि किमान तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळूहळू सूर्यनारायणाचा प्रकोप जवळ येऊ लागला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेही नागपूरसह विदर्भातील चंद्रपूर, वर्धा या शहरांमध्ये उन्हाळयात तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असतो. डिसेंबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राज्यात हिवाळयाचा ऋतू असतो, पण अलीकडच्या काळात हा कालावधी कमी कमी होत आहे.
या काळात वारे उत्तर तसेच ईशान्य-पूर्व या दिशांनी वाहतात. मार्चच्या मध्यानंतर पश्चिमेकडून वारे वाहू लागतात. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यापासून तर मार्चच्या मध्यापर्यंत वाऱ्याच्या दिशेत होत असलेल्या बदलामुळे तापमान कधी एकदम वर जाते, तर कधी गारवा जाणवतो. नागपूरकर सध्या अशाच ऋतूबदलाचा अनुभव घेत आहेत. रात्री अचानक गारवा आणि अचानक उकाडा असे काहीसे विचित्र अनुभवांना सध्या सामोरे जावे लागत आहेत. काही वर्षांपासून देशातील तापमानात वाढीस सुरुवात झाली आहे. अनेकदा उन्हाळ्यातही थंडीची लाट कायम राहिली आहे, तर २०१४ मध्ये गारपिटीचा सामना राज्यातील शेतकऱ्यांना करावा लागला होता. जागतिक तापमानवाढीची कारणे यामागे आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक तज्ज्ञांनी वारंवार नोंदवली आहे. त्यामुळे विकासाची कास धरताना पर्यावरणावरील प्रदूषणाचा परिणाम याचाही विचार होणे गरजेचे आहे. यासाठी कार्बन डायऑक्साईड आणि वाहनांतून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याची गरज पर्यावरणविषयक परिषदेत बोलून दाखविण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थंडपेयांची दुकाने उघडली
घर, दुकाने, कार्यालयातील पंखे कधीचेच सुरू झाले असताना दिवसा लागणाऱ्या उन्हाच्या चटक्यांनी आता वातानुकूलित यंत्रेसुद्धा सुरू झाली आहेत. बाहेर पडल्यानंतर थंडपेयाची दुकाने आणि उन्हापासून बचावासाठी असलेल्या साधनांच्या विक्रीने उन्हाळयाची जाणीव करून देण्यास सुरुवात केली आहे.
यंदा तापमानाचा पारा वाढणार?
फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक तापमान दशकभरापूर्वी म्हणजेच २४ फेब्रुवारी २००६ ला ३९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच २९ फेब्रुवारी २०१२ मध्येसुद्धा ३७.३ इतकी तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे यावर्षी तापमान सरासरी ओलांडणार की सरासरीतच राहणार याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur temperature touches 34 degree celsius
First published on: 24-02-2016 at 03:35 IST