News Flash

टाटांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंची प्रदर्शनातून ओळख

जमशेदजी कधीच संतुष्ट नव्हते आणि हाच त्यांचा असंतोष काहीतरी नवे करण्याकरिता आयुष्यभरासाठी पोषक ठरला.

जमशेटजी टाटा उद्योगपती म्हणूनच जगाला ठाऊक आहेत, पण त्या व्यतिरिक्तही शिक्षण, पर्यावरण आणि जनकल्याणातील त्यांची भूमिका तेवढीच मोठी आणि मोलाची आहे. टाटांच्या या विविधांगी व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंची ओळख करून घेण्याची संधी त्यांच्यावरील प्रदर्शनातून नागपूरकरांना लाभली आहे. हे प्रदर्शन फेब्रुवारी २०१५ मध्ये पहिल्यांदा मुंबईत भरवण्यात आले होते. मुंबईनंतर पुणे, दिल्ली, नवसरी आणि आता नागपूर अशी ही वाटचाल आहे. नागपूर सभागृहात टाटा बाग येथे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

मर्यादेला आव्हान देण्याच्या प्रखर इच्छाशक्तीतूनच विलक्षण कल्पनेचा जन्म होतो, हे प्रदर्शन पाहिल्यानंतर कळते. सामान्य परिस्थितीत जमशेदजी कधीच संतुष्ट नव्हते आणि हाच त्यांचा असंतोष काहीतरी नवे करण्याकरिता आयुष्यभरासाठी पोषक ठरला. लोकप्रिय पर्यायाविरुद्ध त्यांनी अति महत्त्वपूर्ण टेक्सटाईल मिल-द सेंट्रल इंडिया स्पिनिंग, बीविंग अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड-द एम्प्रेस मिल्स स्थापन करण्यासाठी मुंबईऐवजी नागपूरची निवड केली हे नागपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. एम्प्रेस मिल नागपुरात होती हे सर्वानाच ठाऊक आहे, पण मुंबईला डावलून त्यांनी नागपूरमध्ये मिल उभारली हे या प्रदर्शनात आल्यानंतरच कळते. औद्योगिक भारताच्या निर्मितीकरिता त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत व्यावसायिक जोखीम उठवण्यास तयार आहेत. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये टाटांना जाणून घेण्याचे कुतूहल दिसून येत होते. एक विद्यार्थिनी आपल्या सहकाऱ्यांना जमशेटजी टाटा उलगडून दाखवत होती. एका ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना टाटांचे जीवनकार्य उलगडून दाखवण्यात आले.

जमशेटजी टाटा यांनी देशासाठी ध्येयवादी राहून चिकाटी आणि देशप्रेमातून भारतीय उद्योग विश्वात नवा अध्याय सुरू केला. त्यांनी ज्याप्रमाणे वाटचाल केली, त्यानुसार प्रेरणा घेऊन त्यांचे अनुकरण युवा वर्गाने करावे, या उद्देशाने टाटा सेंट्रल आर्काईव्हतर्फे खास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या प्रदर्शनाची रचना केली होती. हे प्रदर्शन चार भागात विभागले असून त्यात टाटा यांनी उभारलेले उद्योग, त्यांचे शिक्षण, पर्यावरण आणि कल्याण सुधारणा या क्षेत्रातील कार्य ठळकपणे मांडले आहे. एक सहल, किपर्स ऑफ द फ्लेम या चित्रफितीचे प्रदर्शन व सोबतच प्रश्नमंजूषा यांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

टाटा सेंट्रल आर्काईव्हतर्फे टाटा समूहांचे संस्थापक जमशेटजी एन. टाटा यांच्यावर नागपूरच्या डॉ. डॅडी बलसारा मेमोरियल सभागृहात, टाटा बाग येथे आयोजित प्रदर्शन १९ नोव्हेंबपर्यंत आहे. या प्रदर्शनात जे.एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज, पोद्दार वर्ल्ड स्कूल, भगवानदास पुरोहित विद्या मंदिर, सीडीएस स्कूल आणि अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय यासारख्या शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी होत आहेत. प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जनतेसाठी खुले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 3:36 am

Web Title: nagpur to host exhibition on jamsetji tata
Next Stories
1 ‘चलनकल्लोळ’चा रोजंदारी कामगार क्षेत्रावर परिणाम
2 अस्वच्छता अन् साथीच्या आजारांचा विळखा!
3 नोटाबंदीचा रॉकेलच्या पुरवठय़ावर परिणाम..
Just Now!
X