अजनी-पुणे वातानुकूलित साप्ताहिक, महाराष्ट्र एक्सप्रेस धावणार

नागपूर : रेल्वेने मुंबई पाठोपाठ पुण्यासाठीही नागपुरातून रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस ११ आणि अजनी-पुणे एसी साप्ताहिक रेल्वे १३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ही पुण्यातील वैदर्भीयांसाठी दिवाळी तोंडावर आनंदाची वार्ता आहे.

रेल्वेने टाळीबंदीमुळे देशातील सर्व प्रवासी रेल्वे बंद केल्या. त्यानंतर सुमारे साडेसहा महिन्यानंतर नागपूरहून पुणे आणि मुंबईसाठी प्रवासी गाडय़ा सुरू केल्या जात आहेत. नागपूर ते पुणे आणि नागपूर मुंबई विमानसेवा सुरू आहे. परंतु अनेकांचे रेल्वेला प्राधान्य असते. मुंबईसाठी दुरान्तो आणि विदर्भ एक्सप्रेस सुरू केल्यानंतर पुण्यातील वैदर्भीयांनी पुण्यासाठी रेल्वेसेवा कधी सुरू करणार असा सवाल केला होता.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेल्वेने नागपूर ते पुणे मार्गावर तीन वातानुकूलित विशेष साप्ताहिक गाडय़ा आणि गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस दररोज सुरू करण्याची घोषणा केली. नागपूर येथून पुणे आणि मुंबईला जाणारे सर्वाधिक प्रवासी आहेत.

या दोन्ही मार्गावर तातडीने

गाडय़ा सुरू करण्याची मागणी होती. महाराष्ट्र सरकारने ‘अनलॉक ५’ केल्यानंतर दोन शहराअंतर्गत प्रवासी रेल्वे सुरू करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांनी आणि रेल्वे

प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. आता दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर रेल्वे या दोन्ही शहरादरम्यान सुरू केल्या आहेत.

यापूर्वी नागपूरमार्गे धावणारी रेल्वे हावडा-मुंबई मेल आणि हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस दररोज सुरू करण्याचा घोषणा झाली आहे.

नागपुरातून सुटणाऱ्या

आणि नागपूरमार्गे विशेष रेल्वे अशा

१)अजनी-पुणे-अजनी एसी साप्ताहिक (१३ ऑक्टोबरपासून)

२) पुणे-नागपूर-पुणे एसी साप्ताहिक (१५ पासून)

३) पुणे-अजनी-पुणे एसी साप्ताहिक (१७ पासून)

४) गोंदिया-कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस (११ पासून)

५) मुंबई-नागपूर-मुंबई दुरान्तो दररोज (९ पासून)

६) मुंबई-गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस दररोज (९ पासून)

७) मुंबई-हावडा-मुंबई मेल दररोज (६ पासून)

८) हावडा-अहमदाबाद-हावडा दररोज (७ पासून)