स्मार्ट सिटी क्रमवारीत गेल्या आठवडय़ात दुसऱ्या क्रमांकावर असलेले नागपूर शहर आता पहिल्या क्रमांकावर आले आहे. अहमदाबाद दुसऱ्या स्थानावर आहे.

स्मार्ट सिटीतंर्गत शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ला केंद्र सरकारच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटीच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक दिला आहे. केंद्र सरकारने शंभर स्मार्ट सिटींची  क्रमवारी जाहीर केली आहे. यात नागपूर शहर ३६४.४७ गुण घेऊन प्रथम क्रमांकावर आहे. अहमदाबाद शहराला ३६२.३४ गुण मिळाले आहेत. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत केलेल्या प्रयत्नामुळे शहराला हे स्थान प्राप्त झाले आहे. स्मार्ट सिटींतर्गत शहरात २१ प्रकल्पांवर कार्य सुरू असून ५१ किलोमीटरचे रस्ते व होम स्विट होमचे कार्य प्रगतीपथावर आहे.

महापालिकेला‘बेस्ट सस्टेनेबल अ‍ॅण्ड लिव्हेबल’पुरस्कार

शाश्वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमाची दखल घेत महापालिकेला पाचव्या ‘अटल शास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार २०१९ या सोहळ्यामध्ये ‘बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्लिन अ‍ॅण्ड इक्ल्यूझिव इन्फ्रा सिटी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील इंडियन र्मचट चेंबर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात महापालिकेचा गौरव करण्यात आला. याच समारंभात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनाही सन्मानित करण्यात आले. बांगर यांना ‘मार्केनॉमी इन्फ्रा लिडरशीप अर्बन म्युनिसिपल इन्फ्रा अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दोन्ही पुरस्कार स्वीकारले. सर्व संकल्पना, उपक्रमांची योग्य अंमलबजावणी करुन नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा हा सन्मान आहे, अशा शब्दांत महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.