अर्ज येताच सहा दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण

नागपूर : पासपोर्टसाठी आवश्यक असलेली चारित्र्य पडताळणी नागपूर पोलिसांद्वारा सहा दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येत आहे. इतर शहरांच्या तुलनेत चारित्र्य पडताळणीसाठी लागणारा हा सर्वात कमी वेळ असून नागपूर शहर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, तर नागपूर ग्रामीण पोलीस चारित्र्य पडताळणीसाठी आठ दिवस घेत असून त्यांनी दुसरे स्थान पटकावले आहे.

परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते.  त्याकरिता भारतीय पारपत्र विभागाकडे रितसर अर्ज करावा लागतो. सर्व आवश्यक दस्तावेजांची छाननी केल्यानंतर सबंधितांचा अर्ज चारित्र्य पडताळणीकरिता पोलिसांकडे पाठवण्यात येते. पूर्वी अनेक दिवस चारित्र्य पडताळणीचा अर्ज प्रलंबित राहात होता. आपल्या अर्जावर लवकर कारवाई होण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना चिरिमिरी द्यावी लागायची. मात्र, नागरिक गरजेच्या वेळीच पासपोर्टसाठी अर्ज करतात व तो अर्ज प्रलंबित ठेवणे योग्य नाही, हे जाणून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी चारित्र्य पडताळणीचे काम गतिमान केले. त्याकरिता उपायुक्त नीलेश भरणे यांचे विशेष प्रयत्न लाभले. त्यानंतर आता विशेष शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनात चारित्र्य पडताळणीसाठी लागणारा वेळ सहा दिवसांवर आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून एप्रिल महिन्याच्या आकडेवारीनुसार नागपूर शहर अव्वल क्रमांकावर तर नागपूर ग्रामीण पोलीस आठ दिवसांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ऑनलाईन प्रक्रियेमुळे काम सोपे  

चारित्र्य पडताळणीची प्रक्रिया ऑनलाईल करण्यात येते. त्यामुळे अर्ज प्राप्त होताच, ताबडतोब पोलीस संबंधिताची चौकशी सुरू करतात. कुणाविरुद्ध गुन्हे दाखल नसतील, तर त्यांचा अर्ज लगेच मंजूर करून पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवण्यात यतो. या प्रक्रियेकरिता पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.