वित्त अधिकारी म्हणतात आरबीआयचे मार्गदर्शन घेणार

नागपूर : खासगी क्षेत्रातल्या ‘येस’ बँकेमध्ये नागपूर विद्यापीठाच्या १९१ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. आता या बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध आणल्याने नागपूर विद्यापीठ मोठय़ा आर्थिक संकटात सापडले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी विद्यापीठावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही असे सांगितले.

आरबीआयने येस बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणल्यानंतर खातेदार अडचणीत आले आहेत. सामान्य खातेदारांना शैक्षणिक, लग्न सोहळ्यासाठी आरबीआयची परवानगी घेऊन ५० हजार रुपये काढता येणार आहेत. मात्र, इतर खातेदारांना पैसे काढता येणार नाहीत. दरम्यान, नागपूर विद्यापीठाचे १९१ कोटी रुपयांच्या ठेवी येस बँकेत २०१८ पासून ठेवल्या आहेत. त्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली होती.

विद्यापीठाला परीक्षा शुल्क आणि विविध स्तरातून दरवर्षी कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळते.  येस बँकेतील रक्कम ही वेतन आणि विकासकामांसाठी खर्च केली जाते. अनुदानरूपात येणारा निधी देखील या बँकेत ठेवींच्या स्वरूपात ठेवला जातो. त्यावर आठ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज मिळते.

दरम्यान, १९१ कोटी रुपयांच्या ठेवी येस बँकेत असल्या तरी घाबरण्यासारखे कुठलंच कारण नाही. विद्यापीठाच्या ठेवी सुरक्षित आहेत. याचा कोणताही परिणाम विद्यापीठावर होणार नाही. याबाबत आरबीआयचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असेही वित्त व लेखा अधिकारी डॉ. हिवसे यांनी सांगितले.

ठेवीच्या मुद्यावरून कुलगुरूंना घेराव

शुक्रवारी झालेल्या विधिसभेच्या बैठकीमध्ये सदस्य अ‍ॅड. मनमोहन वाजपेयींसह अनेकांनी येस बँकेमध्ये पैसे ठेवण्यावरून कुलगुरूंना घेरले. राष्ट्रीय बँकांमध्ये पैसे ठेवण्याचा नियम असताना विविद्यापीठाचे खासगी बँकेला प्राधान्य का दिले असा सवाल करण्यात आला. यावर ज्येष्ठ सदस्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी येसमध्ये विद्यापीठाचे मुदत ठेवी ठेवण्याचा प्रस्ताव कुणाचा होता, यात काही गौडबंगाल आहे का? याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची विनंती केली. त्यावर विद्यापीठाने विधिसदस्य जोशी आणि मनमोहन वाजपेयी यांची समिती स्थापन केली असून या प्रकरणाची चौकशी होणार आहे.