राजकीय क्षेत्रात तीव्र पडसाद; काँग्रेसची टीका, राष्ट्रवादीची निदर्शने

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.ए. (इतिहास)च्या दुसऱ्या वर्षांतील अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केल्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने याचा कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विद्यापीठाच्या निर्णयावर टीका केली तर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली.

विद्यापीठाने ‘बीए’(इतिहास)च्या दुसऱ्या वर्षांतील अभ्यासक्रमात ‘भारताचा इतिहास १८८५-१९४७’ या धडय़ात बदल करून त्यात  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे राष्ट्रनिर्मितीमधील योगदान’, असा विषय समाविष्ट केला आहे.  या सत्रापासून विद्यार्थ्यांना हे धडे शिकवण्यात येणार आहेत. या निर्णयाविरोधात आज मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यापीठापुढे निदर्शने करण्यात आली व कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. संघटनेचे प्रदेश सचिव राहुल पांडे यांच्या नेतृत्तवात  त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापुढे निदर्शने केली. त्यानंतर एक शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटले. भारताच्या स्वातंत्र संग्राम चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान शून्य आहे. मात्र, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर विद्यापीठ हे भाजपचे प्रचार केंद्र झाले आहे. बी.ए.च्या अभ्यासक्रमातून रा.स्व. संघाशी संबंधित पाठ त्वरित वगळण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुलगुरूंना देण्यात आला.

अभ्यासक्रमात संघाचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्यलढय़ासाठी जीवन समर्पित करणाऱ्या  महापुरुषांचा अवमान आहे. महामहापुरुषांचे चरित्रहनन करणे हाच आतापर्यंतचा संघाचा अजेंडा राहिलेला आहे.

हल्ली विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासह सर्वत्र संघाचा वरचष्मा आहे. आता अभ्यासक्रमातही घुसखोरी सुरू केली आहे, अशी टीका काँग्रेस नेते विशाल मुत्तेमवार यांनी केली.

संघ प्रसारासाठी शिक्षण क्षेत्राचा वापर निंदनीय – काँग्रेस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीमध्ये संबंध काय, असा सवाल करून शिक्षण क्षेत्राचा उपयोग संघ विचारधारेचा प्रसार करण्यासाठी करणे निंदनीय आहे, अशी टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सगळ्यात मोठी विभाजनकारक शक्ती आहे. संघटनेचा काळा इतिहास  विद्यार्थ्यांसमोर येणे आवश्यक आहे. ब्रिटिशांबरोबर संगनमत करून स्वातंत्र्य संग्रामाचा केलेला विरोध, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यापासून इच्छुकांना परावृत्त करणे, १९४२ च्या चलेजाव आंदोलनात ब्रिटिशांना केलेली मदत, हे संघाच्या देशविरोधी कारवायांचे प्रतीक आहेत. स्वातंत्र्य मिळण्याच्या कालावधीमध्ये संविधानाऐवजी मनुस्मृती ग्रंथाचा केलेला पुरस्कार, भारतीय तिरंग्याला अशुभ म्हणून ५२ वर्षे स्वत:च्या कार्यालयावर न फडकवणे  हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य राहिलेले आहे. खऱ्या अर्थाने जर विद्यार्थाना राष्ट्रीय संघाची माहिती द्यायची असेल तर त्यांच्यावर तीनदा बंदी का घातली गेली,  हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवावे, अशी कोपरखळी चव्हाण यांनी मारली.