महाविद्यालयांच्या चुकांचा विद्यार्थ्यांना फटका; विद्यापीठाच्या सूचनेकडे दुर्लक्ष

नागपूर : अंतिम सत्र वगळता इतर सत्रातील कुठल्याही विषयात अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर घ्याव्या, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दिल्या असतानाही संलग्नित महाविद्यालयांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षाच न घेता विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. यामुळे अंतिम वर्षी उत्तीर्ण झाले तरी आधीच्या सत्रांतमध्ये एखाद्या विषयात अनुत्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश मिळणे कठीण होणार आहे.

करोना संकटामुळे यंदा परीक्षा पद्धती आणि नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. यानुसार अंतिम सत्र वगळता सर्व विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश दिला आहे. तर अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षाही विद्यापीठाने घेतली आहे. हे करताना नागपूर विद्यापीठाने सुरुवातीलाच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यांच्या पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात स्पष्ट दिशानिर्देश जाहीर केले आहेत. विद्यापीठाच्या पत्र १२/२०२० नुसार अंतिम सत्राचे विद्यार्थी वगळता अन्य सर्व सत्रांचे नियमित आणि बहि:शाल विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश दिला जाणार आहे. एटीकेटीमुळे पुढील वर्गात प्रवेश न घेऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होणार आहे.  करोना संक्रमणामुळे विशेष परिस्थिती म्हणून विद्यापीठाने अशी परवानगी दिली आहे. तर पत्र २०/२०२० नुसार नागपूर विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना अनुत्तीर्ण आणि बहि:शाल विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याचे निर्देश दिले होते. असे असतानाही अनेक महाविद्यालयांनी अद्यापही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे विचारणा केली असता विद्यापीठाने आम्हाला असे कुठलेही आदेश दिले नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहे. यामुळे अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाच्या अडचणी येणार आहेत.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठाने आधीच स्पष्ट आदेश दिले होते. महाविद्यालयांना माहितीचा अभाव असल्याने त्यांनी परीक्षा घेतल्या नसाव्या असा अंदाज आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात सर्व सूचना दिल्या असून त्यानुसार महाविद्यालयांनी आपली जबाबदरी पूर्ण करावी.

– डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.