येथे मजकूर चोरणारे आहेत, विनयभंग करणारे आहेत, भ्रष्टाचारी आहेत, जातीयवादी आहेत, कटकारस्थानात पारंगत असलेले आहेत, महिलांची छेड काढणारे आहेत. साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून स्वत:चा स्वार्थ साधणारे आहेत. हे वर्णन एखाद्या राजकीय वर्तुळाचे असावे, असा अनेकांचा ग्रह होऊ शकतो, पण तो चुकीचा आहे. या गुणवैशिष्टय़ांनी नटलेली माणसे येथील विद्यापीठात सामावलेली आहेत. त्यामुळे हे विद्यापीठ आहे की कारस्थान्यांचा अड्डा, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. या विद्यापीठात चालणारे धंदे ऐकले की  हाच शब्द डोळ्यासमोर येतो. हे दुर्दैवी आहे, पण वास्तव आहे. याचा अर्थ या पीठातील सारेच तसे आहेत असे नाही. येथे काही सभ्य, सुसंस्कृत माणसे आहेत. शिकवणे हा आपला धर्म आहे, यावर अजूनही त्यांनी विश्वास बाळगलेला आहे. विद्यार्थीप्रिय अशी त्यांची ओळख आहे. सध्याच्या घाणेरडय़ा गदारोळात हा विवेकी माणूस स्वत:ची ओळख विसरून जातो की काय, अशी भीती आता वाटायला लागली आहे. तरीही अशा बदनामांच्या वर्तुळात वावरणारी ही चांगली माणसे काही न बोलता आपले कर्तव्य नीटपणे बजावत आहेत. मात्र चांगले काही उपक्रम सुचवावे असे त्यांना वाटत नाही, इतके येथील वातावरण गढूळ झाले आहे. विद्यापीठ म्हटले की राजकारण आले आणि जिथे राजकारण होते तिथे त्याचा स्तर काय असावा, याला मर्यादा नसते हा युक्तिवाद सध्या या वर्तुळात चर्चिला जात आहे. मूळात तो अर्धसत्य आहे. राजकारण सुद्धा विधायक व रचनात्मक असू शकते, हे तत्त्व ही युक्तिवादी मंडळी विसरून गेली आहे. खरे तर विद्यापीठातील राजकारण हे विद्यार्थीकेंद्रित, त्यांच्या हिताचे, भिन्न विचारसरणीतून उद्भवणाऱ्या प्रासंगिक वादाचे व त्यावर परस्परविरोधी मतांचा आदर राखत तोडगा काढण्याचे कौशल्य असणारे असायला हवे. या विद्यापीठाच्या इतिहासावर नजर टाकली तर हेच दिसते, पण सध्याचे राजकारण सूडाचे, चारित्र्य हननाचे, एकमेकांचे कपडे फाडण्याचे व प्रसंगी विरोधकाला तुरुंगात घालण्याचा अट्टाहास असलेले आहे. यात विद्यार्थीहित कुठेही नाही. अभ्यासक्रम अथवा कोणत्या विद्याशाखेच्या प्रगतीशी, दर्जाशी संबंधित हे राजकारण नाही. दोन व्यक्तीभोवती फिरणारे हे राजकारण अख्ख्या विद्यापीठाची प्रतिष्ठा घालवणारे आहे, याची चिंता कुणाला नाही. जे या कटकारस्थानाच्या राजकारणात कुणाची तरी एकाची बाजू घेऊन उभे आहेत ते प्रतिस्पध्र्याची कशी जिरवली, याच समाधानात आहेत. जे कुंपणावर आहेत ते मनातल्या मनात टाळ्या पिटत आहेत आणि ज्यांचा या वादाशी काही संबंध नाही किंवा त्यांना ठेवायचा सुद्धा नाही अशांनी स्वत:चे कान बंद करून ठेवले आहेत. यातला विद्यापीठाविषयी आस्था व कळवळा असलेला आवाज क्षीण आहे. अनेकांना तो ऐकूच येत नाही. एखाद्या संस्थेची अधोगती कशी होते, हे बघायचे असेल तर शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी या विद्यापीठाला जरूर भेट द्यावी. ज्यांच्यामुळे हे विद्यापीठ बदनामीच्या सावटात अडकले आहेत, त्यांना तसेच त्यांच्या राजकारणाला मोठे करणारे याच मुलखातील आहेत. मूळात लबाड व चोर लोकांना आपण मोठे करतो आहोत, याची जाणीव त्यांना तेव्हाही नव्हती व आताही नाही. या दुसऱ्यांच्या बळावर मोठे झालेल्या या व्यक्तींनी मग ज्ञानी असल्याचा आव आणला व अवतीभोवतीच्या साऱ्यांनी त्याच्या अंगी नसलेल्या विद्वत्तेवर शिक्कामोर्तब करून टाकले. मग जग जिंकल्याच्या थाटात ही मंडळी कधी दुसऱ्यांच्या प्रबंधातील मजकूर चोरू लागली तर कधी विनयभंगाचे धाडस करू लागली. त्यांचे हे उसने ज्ञानीपण त्यांना नेत्यांच्या वर्तुळात शिरकाव मिळवून देणारे ठरले व त्यातून त्यांची नानाविध पदावर वर्णी लागू लागली. यातून विद्यापीठ खिशात असल्याचा माज त्यांच्यात आला व मग नको ती प्रकरणे घडू लागली. जोवर त्यांच्याकडून फायदा होता तोवर साऱ्याच विचारांनी त्यांना वापरून घेतले. विद्याशाखेशी संबंध नाही, अशा ठिकाणांची प्रमुखपदे यातूनच दिली गेली. अडचणीचे ठरू लागल्यावर मग त्यांची जागा दाखवण्याचे उद्योग सुरू झाले व त्यातून प्रकरणे बाहेर येऊ लागली. शेवटी या वादाला कुरघोडीची किनार लाभली व सारे विद्यापीठच या बदनामीच्या रंगात न्हाऊन निघाले. या मंडळींचा उदय ते अस्तापर्यंतचा हा प्रवास विद्यापीठाच्या अधोगतीची गाथा सांगणारा आहे. मात्र कुणाही सुज्ञाच्या लक्षात हे आले नाही. ज्यांच्या आले त्यांनी पुन्हा राजकारणाला प्राधान्य दिले. असे भंपक आदर्श समोर ठेवून विद्यापीठाच्या राजकारणात आलेल्या नव्या पिढीने तोच कित्ता गिरवला. स्वत:ची मांड मजबूत करताना कधी जातीचा, कधी या तर कधी त्या विचाराचा आधार घेत विद्यापीठात स्वत:चा मठ तयार करणाऱ्यांची संख्या या काळात बरीच वाढली. परमार्थाची भाषा करणे व प्रत्यक्षात स्वार्थ साधणे हाच हेतू या साऱ्यांनी बाळगला. परिणामी, हे विद्यापीठ विद्यार्थीकेंद्रित राहिले नाही. आज राज्य व देशपातळीवर या विद्यापीठाचा क्रमांक तळाला आहे. येथील पदवीला कुणी विचारत नाही अशी स्थिती आहे. येथे शिक्षण सोडून बाकी सर्व काही होते, असा समज दूरवर पसरल्याने हुशार विद्यार्थी स्थलांतरित होऊ लागले. ज्यांच्याजवळ पर्याय नाही असेच बिचारे येथे राहिले. या सगळ्याचा परिणाम विद्यार्थी संघटनांच्या कणाहीन होण्यात झाला. त्यामुळे स्वार्थी, कपटी व कारस्थानी विद्वानांच्या कारवायांचा घोडा चौफेर उधळत राहिला. गटबाजी, गलिच्छ राजकारणाला पूर आला. या पुरातून विरुद्ध दिशेला पोहत जाऊन काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न काहींनी केला, पण तेही थकले व त्यांनाही या कथित विद्वानांच्या विखुरलेल्या मठात स्वत:साठी आधार शोधावा लागला. आता चर्चेत असलेली प्रकरणे गंभीर असली तरी हिमनगाची फक्त टोके आहेत. यातून बदनामीशिवाय काहीही हाती पडणार नाही, याची कल्पना साऱ्यांना आहे. जरा शांत झाले की हेच ज्ञानी व त्यांचे मठ पुन्हा या विद्यापीठाला ओरबडून काढण्यासाठी सज्ज होतील यात शंका नाही. सूट, बूट, टाय व कोट घातलेले, नावासमोर अनेक पदव्या मिरवणारे लोक सभ्य व सुसंस्कृत असतात, हा समज या विद्यापीठातील कारस्थाने बघितल्यावर गळून पडतो. पक्षीय राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी कोणत्याही पक्षात जाण्यापूर्वी या विद्यापीठात राजकारणाचे धडे गिरवायला काही हरकत नाही, तेवढा लौकिक या विद्यापीठाने नक्कीच कमावला आहे.

devendra.gawande@expressindia.com