वर्षांनुवर्षे महाविद्यालयात शिक्षक भरतीचे फर्मान सोडूनही दुर्लक्ष करणाऱ्या महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द करण्याचा इशारा नागपूर विद्यापीठाने दिला असून अशा ७५ महाविद्यालयांची यादीच प्रसिद्ध केली आहे. ही बहुतेक महाविद्यालये राजकारण्यांची असून पारंपरिक अभ्यासक्रम असलेली आहेत.
विद्यापीठाचा कायदा व त्याअंतर्गत ठरवली जाणारी धोरणे संलग्नित महाविद्यालयांना बंधनकारक असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करून महाविद्यालये विद्यार्थ्यांचे प्रवेश करीत राहतात. परीक्षेची वेळ येते तेव्हा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी विद्यापीठाकडून प्रवेशपत्र मिळत नाही. कारण महाविद्यालयाने नियमांची पूर्तता न करता केलेली मनमानी असते. २००९-१० मध्ये सुमारे साडेतीनशे महाविद्यालयांना काळ्या यादीत टाकून विद्यापीठाने गहजब केला होता. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंशत: शिक्षक भरतीबरोबरच इतर सुविधा उभ्या करण्याचे काम तेजीत झाले. त्यानंतर विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक, प्राचार्य आणि इतर सुविधा नसलेल्या महाविद्यालयांचा आकडा २५० वर आला.
संस्थाचालक न्यायालयात गेले आणि हमीपत्र दाखल करून त्यांनी काही प्रमाणात का होईना दिलासा मिळवला. मात्र, शिक्षक भरती प्रक्रिया सुरूच होती. आता त्या २५० महाविद्यालयातून ७५ महाविद्यालये अशी आहेत की, जेथे एकही शिक्षक नाही. निदान तशी माहिती तरी विद्यापीठात नाही. त्यामुळेच अशा महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द करण्याचा इशारा महाविद्यालये व विकास मंडळाने दिला आहे.
त्यात कला, वाणिज्य, विज्ञान, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र, एमबीए, काम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, शारीरिक शिक्षण इत्यादी विषयांच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. नागपुरातील ३८ आणि नागपूर ग्रामीणमधील ३७ महाविद्यालयांच्या असंलग्निकरणाची एक प्रकारे
नोटीस बजावण्यात आली
आहे. पत्र, स्मरणपत्रे पाठवूनही संलग्नित महाविद्यालये विद्यापीठाला अजिबातच जुमानत नसल्याचे स्पष्ट झाल्यानेच विद्यापीठाने हा फतवा काढला आहे. प्राचार्यपदाचे ना हरकत प्रमाणपत्र विद्यापीठाकडून न घेणे, शिक्षकपदाचे प्रमाणपत्र न घेणे, अभ्यागत मान्याप्राप्त शिक्षक आहे की नाही व असल्यास संख्या किती, याची माहितीही विद्यापीठाला न देणे, अशी त्यामागची कारणे आहेत. महाविद्यालयात शिक्षक असले तरी विद्यापीठाला माहिती न पोहोचवल्यामुळेही विद्यापीठाने नाराजी व्यक्त केली आहे.
वर्धमाननगरचे कला, वाणिज्य महाविद्यालय, हिंगण्याचे प्रियदर्शिनी इन्स्टिटय़ूट ऑफ काम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, नंदनवनचे प्रियदर्शिनी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, धंतोलीचे मुकेश गुप्ता गृहविज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दिघोरीचे मधुकर महाकाळकर काम्प्युटर विज्ञान महाविद्यालय इत्यादींनी तीन वर्षांपासून विद्यापीठाशी पत्रव्यवहार केलेला नसल्याची यादीच बीसीयुडी संचालक डॉ. दिनेश अग्रवाल यांनी प्रसिद्ध केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, यातील महाविद्यालये माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि इतर राजकारण्यांची आहेत.