09 July 2020

News Flash

‘माझी जन्मठेप’साठी अभ्यासक्रमाच्या रचनेत बदल!

नागपूर विद्यापीठाची गुप्त धडपड अखेर उघड

| June 30, 2020 12:27 am

संग्रहित छायाचित्र

देवेश गोंडाणे

मराठी वाङ्मय अभ्यासक्रमामध्ये आतापर्यंत कादंबरी आणि नाटक हे दोनच साहित्य प्रकार प्रमुख मानले जातात. त्यामुळेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. प्रथम वर्षांच्या मराठी वाङ्मय अभ्यासक्रमात वि.दा. सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ हे आत्मचरित्र लागू करण्याच्या प्रस्तावाला मराठी अभ्यास मंडळातील काही सदस्यांचा प्रखर विरोध होता. हा विरोध लक्षात घेऊन हे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी आता चक्क अभ्यासक्रमाची रचनाच बदलण्यात आली आहे.

अभ्यास मंडळातील बहुमतात असलेल्या विशिष्ट विचारधारेच्या सदस्यांनी अभ्यासक्रमामध्ये कादंबरी ऐवजी आत्मचरित्राचा समावेश करत अखेर ‘माझी जन्मठेप’ अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे. विद्यापीठांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेल्या या विशिष्ट विचारांच्या घुसखोरीवर प्रचंड टीका केली जात आहे. विशेष म्हणजे, ‘लोकसत्ता’नेही अभ्यास मंडळातील या एकाधिकारशाहीवर प्रहार केला होता.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर संघ परिवारातील विविध संस्थांकडून सावरकरांचे जीवनपट उलघडणारे विविध कार्यक्रम, व्याख्याने, एकांकिकाचे आयोजन करून एक मोहीमच सुरू करण्यात आली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्राचा कादंबरी प्रकारामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव मराठी अभ्यास मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. विद्यापीठाच्या बैठकीत याआधीही सदस्यांमध्ये सावरकरांवरून जोरदार रणकंदन झाले होते.

‘माझी जन्मठेप’ हे आत्मचरित्र असून कादंबरी  प्रकारात मोडत नसल्याचा दाखला देत काही सदस्यांनी हे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता. नवीन अभ्यासक्रम जाहीर करण्यासाठी सोमवारी मराठी अभ्यास मंडळाच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, इतर सदस्यांच्या सूचनांना विचारातच घेतले जात नसल्याचा आरोप करीत काही सदस्यांनी  या बैठकीवर बहिष्कार घातला. मात्र, नवीन अभ्यासक्रम समोर आला तेव्हा ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक आत्मचरित्र म्हणून अभ्यासक्रमात लागू केले जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली.

विरोध का?

कादंबरी आणि नाटक हे प्रकार डावलून जाणीवपूर्वक आत्मचरित्राची निवड करण्यात आली, असा आरोप करून आत्मचरित्राचा समावेश करायचाच असेल तर एकाहून एक सरस आत्मचरित्र असताना ‘माझी जन्मठेप’च का, असा सवाल या प्रकाराला विरोध करणाऱ्यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा समकालीन प्रश्नांशी निगडित असावा असे धोरण आहे. आत शेती, ग्रामीण, दलित साहित्य असे अनेक समकालीन प्रश्न असतानाही ‘माझी जन्मठेप’ लागू करण्याचा अट्टाहास का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:27 am

Web Title: nagpur universitys secret struggle finally revealed v d savarkar proposal to implement his autobiography abn 97
Next Stories
1 वन्यजीव मंडळाला बगल देत तिल्लारीचे राखीव क्षेत्र जाहीर
2 स्पर्धा परीक्षांच्या जादा शुल्कामुळे ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांमध्ये असंतोष
3 एकाच्या वेतन खात्यात ६० तर दुसऱ्याच्या ९८ रुपये!
Just Now!
X