उपराजधानीच्या इतिहासातील पहिलीच घटना

मुलीचा ताबा आणि पोटगी मिळण्यासाठी पत्नीने दाखल केलेल्या दोन वेगवेगळया खटल्यांमध्ये पतीने भारतात परतण्यास नकार दिला. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्राने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नागपुरातून-अमेरिकेत संपर्क साधून गुरुवारी सुनावणी केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अमेरिकेच्या व्यक्तीची सुनावणी घेण्याचा नागपूर न्यायपालिकेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुणे येथील अरुण आणि नागपुरातील शीतल (नाव बदललेले) यांचा २५ नोव्हेंबर २००२ मध्ये हिंदू रीतीरिवाजानुसार विवाह झाला. अरुण हा अमेरिकेतील मोर एवेन्यू, लॉस गॉटोस, कॅलिफोर्निया येथील रहिवासी असून तो एका सॉफ्टवेअर कंपनीत संचालक पदावर आहे. तो १९ वर्षांपासून विदेशात राहत असल्याने त्याला अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले आहे. तर शीतल ही उच्चशिक्षित आहे. अरुणला महिन्याला २ लाख डॉलर इतके गलेलठ्ठ वेतन आहे. लग्नानंतर शीतलला घेऊन तो अमेरिकेला गेला. लग्नानंतर सहा वर्षांनी म्हणजे ४ जुलै २०१० त्यांना एक मुलगी झाली. मात्र, मुलीचा ही रंगाने काळीसावळी असल्याने अरुणच्या स्वभावात अचानक बदल झाला आणि तो मुलगी व पत्नीचा तिरस्कार करू लागला.

मुलीच्या जन्मानंतर तो शीतलला सामंजस्याने विभक्त होण्यासाठी दबाव टाकू लागला. मात्र, शीतल तयार नव्हती. तिला घटस्फोट नको होते. दरम्यान, तिच्या आईला कर्करोगाचे निदान झाले. तिच्या आईला मुंबई येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे तिने आईला भेटण्यासाठी भारतात जाण्याची इच्छा अरुणकडे व्यक्त केली होती. परंतु त्याने नकार दिला. शिवाय भारतात परतण्यासाठी शीतलला पैसे देण्यासही नकार दिला. त्यामुळे शीतलच्या भावाने तिचे आणि तिच्या मुलीचे विमानाचे तिकिट तयार केले. त्यानंतर २५ फेब्रुवारी २०१५ ला ती मुलीला घेऊन मुंबईत पोहोचली. जवळपास तीन ते चार महिने उपचार घेतल्यानंतर तिच्या आईची प्रकृती स्थिरावली. त्यामुळे ३ जून २०१५ ला तिने पती अरुणला भ्रमणध्वनी करून परतण्याची इच्छा दर्शविली. त्यावेळी त्याने तिला परत न येण्याचा नकार दिला. तसेच तिच्या ‘व्हिसा’ची मुदत संपली असताना ती मुदत वाढविण्यात येऊ नये म्हणून अमेरिकन दूतावासाला कळविले.

यानंतर २२ आणि २३ ऑगस्ट २०१५ ला अरुणच्या वकिलाने अमेरिकेच्या न्यायालयात मुलीचे अपहरण आणि घटस्फोट याचिका केली. त्या याचिकांमध्ये अमेरिकेच्या न्यायालयाने अरुणच्या बाजूने एकतर्फी निकाल दिला. या संदर्भात अरुणच्या वकिलाने ई-मेलद्वारे शीतलला कळविले. त्यामुळे २४ ऑगस्टला तिने नागपुरातील कौटुंबिक न्यायालयात मुलीचा ताबा आपल्याकडेच असावा आणि नवऱ्याकडून मुलीच्या व आपल्या उदरनिर्वासासाठी पोटगी मिळावी, यासाठी याचिका केली. या याचिकांवर कौटुंबिक न्यायाधीश पलक जमादार यांच्यासमक्ष सुनावणी आहे. मात्र, न्यायालयाने वाद सामंजस्याने सोडविण्याच्या दृष्टीने प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठविले. अ‍ॅड. पद्मा चांदेकर यांची मध्यस्थी म्हणून नेमणूक करण्यात आली. मध्यस्थी केंद्राने अनेकदा अरुणला सुनावणीसाठी हजर होण्यास बजावले. मात्र, तो सातत्याने अनुपस्थित राहिला. त्यामुळे काल गुरुवारी मध्यस्थी केंद्राने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी केली.

पाऊणा तास सुनावणी चालणार

मध्यस्थी केंद्रात सुनावणी पत्नी शीतलसह मध्यस्थी अ‍ॅड. पद्मा चांदेकर आणि दुसरीकडून अमेरिकेतून अरुण होता. ही सुनावणी सकाळी ११.१५ वाजता सुरू झाली. तर दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होती. पाऊस तासात मध्यस्थी कक्षात दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडली. मात्र, गुरुवारी कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे प्रकरणाची सुनावणी आता १६ सप्टेंबरला ठेवली आहे.