News Flash

नागपूर-वर्धा चौथ्या रेल्वेमार्गाच्या घोषणेने प्रवाशांना थोडा दिलासा

चौथा मार्ग मंजूर केल्याने अर्थसंकल्पात काहीतरी मिळल्याचे समाधान नागपूरकरांना मानावे लागणार आहे.

संग्रहीत छायाचित्र.

रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरला नेमके काय? याबाबत सारेच संभ्रमित
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोणत्याच प्रकारची भाडेवाढ न करता प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी ‘मेक इन इंडिया’च्या दृष्टीने रेल्वेला भरारी देण्यासाठी मोठे प्रकल्प किंवा प्रवाशांची वाढती संख्या बघता रेल्वेगाडय़ांची घोषणा न केल्याने निराशा केली आहे. नागपूर-वर्धा मार्ग अत्यंत व्यस्त रेल्वेमार्ग आहे. येथे चौथा मार्ग मंजूर केल्याने अर्थसंकल्पात काहीतरी मिळल्याचे समाधान नागपूरकरांना मानावे लागणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बर्थचा कोटा वाढण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक गाडीमध्ये १२० लोअर बर्थ देण्याची घोषणा करण्यात आली. तीर्थयात्रेसाठी आस्था सर्किट ट्रेन, सामान्य नागरिकांसाठी अंत्योदय ही पूर्णपणे अनारक्षित गाडी सुरू करण्यात येणार आहे.
तसेच हमसफर, तेजस आणि उदय नावाने गाडय़ा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, या गाडय़ा कोणत्या मार्गावर आणि केव्हा सुरू होतील.याविषयी रेल्वे अर्थसंकल्पात स्पष्टता नाही. यामुळे नागपूरला नेमके काय मिळाले हे कुणालाही सांगता येणे शक्य नाही. रेल्वेचे अधिकारीदेखील याबाबत संभ्रमित आहेत.
या अर्थसंकल्पात ४०० रेल्वे स्थानकावर दोन वर्षांत फ्री वाय-फाय सेवा देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच १११ स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात येतील, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले आहे. वायफायसाठी निवडण्यात येणाऱ्या ४०० रेल्वे स्थानकामध्ये नागपूर, अजनी किंवा रेल्वे स्थानकांचा समावेश असेल काय, सीसीटीव्ही नेमक्या कोणत्या रेल्वे स्थानकावर लावण्यात येतील. या प्रश्नांचे उत्तर मात्र मिळू शकले नाही. या रेल्वे अर्थसंकल्पातील आणखी महत्त्वाची घोषणा म्हणजे ४०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यामध्ये नागपूर किंवा विदर्भातील रेल्वेचा स्थानकांचा समावेश असेल काय, अशी अर्थसंकल्पाने उत्सुकता निर्माण केली आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या दुसऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात मोघम घोषणा आहेत. याआधीच्या रेल्वे अर्थसंकल्पात काटकसरीवर भर देण्यात आला होता. यावेळी संपूर्ण देशासाठी चार प्रकारच्या गाडय़ा सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा आहे. मात्र अर्थसंकल्पात सुस्पष्टता नसल्याने जनतेला या अर्थसंकल्पात काय आहे, याचे उत्तर देण्यास रेल्वेमंत्री अपयशी ठरले आहेत.

जुन्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद
* भुसावळ-चांदूर बाजार-अमरावती मार्ग (७५ किमी)
* भुसावळ-बडनेरा-वर्धा मार्ग (३१४ किमी)
* इटारसी-वर्धा-बल्लारशहा (७८ किमी) तिसरा मार्ग
* वरोरा-उमरेड मार्ग मार्ग (१०६ किमी)
* नरखेड-वाशीम मार्ग (२३२ किमी)

मध्य रेल्वेसाठी ७ नवीन मार्गाच्या सर्वेक्षणाला आणि दोन ठिकाणी चौथा तसेच तिसऱ्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. भुसावळ-जळगाव आणि वर्धा-नागपूर यादरम्यान चौथ्या मार्गालाच मंजुरी मिळाली आहे. तिसऱ्या मार्गाबरोबरच चौथा मार्ग बांधण्यात येईल. यामुळे मार्ग टाकण्यास येणारा खर्च कमी होण्याची शक्यता आहे.
– सुनीलकुमार सूद, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

भविष्याचा अर्थसंकल्प
सुरेश प्रभू यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. परंतु त्यांनी वर्तमानात प्रवाशांसाठी काही करण्याऐवजी भविष्यात काय करणार याची जंत्री सादर केली आहे. गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना सामान्य डबे बसवण्यात येतील, असे सांगितले होते. ते अद्याप झालेले नाही. या अर्थसंकल्पात चार गाडय़ांची घोषणा झाली. या गाडय़ा कोणत्या मार्गावर धावणार हे स्पष्ट गेले नाही. अत्यंत दिशाहीन असा अर्थसंकल्प आहे.
– बसंत शुक्ला, रेल्वे यात्री केंद्र.

घोषणांचा बाजार
मागील घोषणा पूर्ण झालेल्या नाहीत. अनेक रेल्वे मार्गाची कामे रखडली आहेत. परंतु घोषणा केल्या जात आहेत. या सर्व गोष्टींचा भरुदड प्रवाशांवर पडणार आहे. ज्या सोयी-सुविधा प्रवाशांना मिळायला हव्यात, त्यापासून ते वंचित राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ देण्यात येईल. परंतु एका कुटुंबातील दाम्पत्यांना दोन वेगवेगळ्या डब्यात बसावे लागेल, असे परिपत्रक रेल्वेने काढले आहे. त्याचा खुलासा रेल्वे अर्थसंकल्पात व्हायला हवा होता. एकंदरीत हा रेल्वेअर्थसंकल्प केवळ लॉलीपॉप दाखवणारा आहे. राजकीयदृष्टय़ा सोयीचा आहे. प्रवाशांना यातून दिलासा मिळेल, असे वाटत नाही.
-अशोक पात्रिकर, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 2:57 am

Web Title: nagpur wardha fourth rail route in railway budget gives little comfort to passengers
टॅग : Budget
Next Stories
1 रेल्वे अर्थसंकल्पात वैदर्भीयांची पुन्हा निराशा
2 जिल्हा न्यायालयात महिनाभरात सीसीटीव्ही; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
3 आमदार सुधीर पारवेंच्या अपात्रतेसंदर्भात सुनील मनोहर ‘न्यायालयीन मित्र’
Just Now!
X