कॉनकॉरचे मुख्य महाव्यवस्थापक अनुपकुमार सतपथी यांचा विश्वास; अनुपकुमार सतपथी

मागच्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा आयात-निर्यातीचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु अशाही परिस्थितीत कॉनकॉर, नागपूरने मध्य भारतात आपले वर्चस्व कायम ठेवले असून ७० टक्के समभाग आपल्या नावे करण्यात यश मिळवले आहे. नागपूर शहर सध्या लॉजिस्टिक हबकडे वाटचाल करत असून लवकरच ते भारतातील दळवळणाचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास कॉनकॉरचे मुख्य महाव्यवस्थापक अनुपकुमार सतपथी यांनी व्यक्त केला. लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

सतपथी म्हणाले, कॉनकॉर ही मालवाहतूक सेवा देणारी भारतातील सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे. आमची कोणाशी स्पर्धा नाही. खासगी क्षेत्रातही कंटेनर डेपो आहेत. ते देखील ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा विश्वास दर्शवतात. मात्र आम्ही ग्राहकांना त्यांच्यापेक्षा उत्तम आणि कमीत कमी खर्चात सेवा देतो.  पूर्वी या उद्योगात शंभर टक्के मालवाहतूक रस्ते मार्गाने होत होती. मात्र  ग्राहकांना जलद सेवा हवी असल्याने आज नागपूर विभागातून ९० टक्के मालवाहतूक रेल्वेतून करीत आहोत. केवळ दहा टक्के वाहतूक रस्ते मार्गाने सुरू आहे. आता तर कॉनकॉरने जलवाहतूकदेखील सुरू केली आहे. कृष्णापट्टम पोर्टवरून आम्ही जहाज भाडय़ाने घेऊन जलमाग्रे थेट बांगलादेशला माल निर्यात करतोय. मिहान कंटेनर डपो सुरू होताच मोठय़ा प्रमाणात आयात आणि निर्यात शक्य होईल. शिवाय येथून मध्यभारतात सर्व ठिकाणी मालवाहतूक करणे सोयीचे जाईल. येथे आम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दहा हजार रोजगार  देऊ शकू. सध्या नागपुरातून ६० टक्के माल निर्यात होत असून ४० टक्के मालाची आयात होते. देशात कॉनकॉरचे ८३ कंटेनर डेपो आहेत. भविष्यात ही संख्या शंभरच्या घरात न्यायची आहे. सध्या नागपुरातून सर्वाधिक तांदूळ निर्यात होत असून तो युरोपिय देशात जातो. नागपूर केंद्राने  गेल्यावर्षी ३०७ कोटींचा व्यवसाय केला. आम्ही आपले जाळे वाढवण्यासाठी काही निवडक रेल्वेस्थानक जसे भोपाळ, इटारसी, सिवनी येथून कंटेनरची सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असून काही ठिकाणी सेवा सुरूही केल्याची  माहिती सतपथी यांनी दिली.

दीड महिन्यात मिहान डेपोतून रेल्वे वाहतूक

कॉनकॉरला गती देण्यासाठी आम्ही मिहान डेपोतून लवकरच रेल्वे मालवाहतूक सुरू करत आहोत. रेल्वेकडून त्यासाठी परवानगी मिळाली आहे. रेल्वेला ५० कोटींचा निधी देखील देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे सुरू आहे. तेथे रेल्वेच्या तीन लाईन आहेत. एकदा मिहानमधून सेवा सुरू होताच ते मध्य भारतातील दळणवळणाचे ते प्रमुख लॉजिस्टिक केंद्र बनेल. शिवाय ग्राहकांना खर्च देखील कमी येईल. १२० एकर मध्ये ते तयार करण्यात आले असून एक लाख चौरस मीटरपेक्षा जास्त असे चार मोठे वेअर हाऊस तेथे आहेत.

कॉनकॉरचे खासगीकरण नाही

केंद्र सरकार कॉनकॉरचे खासगीकरण करेल, असे वाटत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे, कॉनकॉर एक नवरत्न सरकारी कंपनी आहे. कॉनकॉर खासगी कंपन्यांवर मात करून फायद्यात सुरू आहे. त्यामुळे खासगीकरणासारखी वेळ येण्याचे काही कारण दिसत नाही.

नागपूरहून कार्गो वाहतूक लवकरच

नागपुरातून कार्गो वाहतुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कस्टमच्या काही परवानग्या मिळवणे बाकी आहे. यासाठी आम्हाला मोठा कार्गो ऑपरेटर हवा आहे. त्याचा शोध सुरू आहे. कतार एअरवेजसोबत विमानतळ प्राधिकरणाची बोलणी सुरू आहे. मुंबई विमानतळाचे कार्गो कॉनकॉर हाताळतो. त्याप्रमाणे आम्ही नागपूर आणि भोपाळमध्ये कार्गो सेवा लवकरच सुरू करणार आहोत, याकडेही सतपथी यांनी लक्ष वेधले.